मुंबई, 8 जानेवारी : 'यवतमाळच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलावले होते, पण महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांची नयनतारा यांच्या भाषणाने गोची होऊ शकते, अशी भीती वाटल्याने त्यांचे निमंत्रण रद्द केले आहे,' असं म्हणत 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना यवतमाळ इथं होत असलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून बोलावण्यात आलं होतं. पण सहगल यांचं छापील भाषण समोर आल्यानंतर अचानक त्यांचं निमंत्रण रद्द करण्यात आलं. या प्रकरणावरून साहित्य महामंडळ आणि सरकारवर सध्या चहुबाजूने टीका सुरू आहे. त्यातच आता मित्रपक्ष शिवसेनेनंही भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख?
नयनतारा यांना रोखण्यासाठी पडद्यामागे ज्या हालचाली व कारस्थाने झाली ती महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणारी नाहीत. नयनतारा सहगल या स्वतंत्र बाण्याच्या बंडखोर लेखिका आहेत. त्यांचे विचार यवतमाळच्या साहित्य संमेलनात राज्यकर्त्यांना काटय़ासारखे टोचतील व राज्यकर्त्या पक्षाची नाराजी साहित्य संस्थांना भोगावी लागेल या भयातून हे निमंत्रण रद्द केले. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात आता साहित्य सहवास कमी व राजकीय गुंता जास्त झाला आहे. सरकार संमेलनास पाच-पन्नास लाख देते, त्या बदल्यात मुख्यमंत्र्यांना उद्घाटनास बोलवायचे हा पायंडा आहे. संमेलनातले वाद काही नवीन नाहीत, पण पूर्वीप्रमाणे हे वैचारिक, साहित्यिक वाद नसून राजकीय टोळभैरवी वाद होत आहेत. बेळगावच्या साहित्य संमेलनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव संमत झाला, पण महाराष्ट्रातील किती साहित्यिक आज मराठी भाषा, बेळगाव, मुंबईतील मराठीवरील आक्रमणावर उघडपणे भूमिका घेतात? अखिल भारतीय या पाटीखाली होणाऱ्या संमेलनात एखाद्या ‘राष्ट्रीय’ विषयावर धाडसाने भूमिका घेतल्याचे उदाहरण अलीकडच्या काळात नाही. जसे वीर सावरकरांनी ‘लेखण्या मोडा व बंदुका हाती घ्या’ असे आवाहन साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केले होते तसे साहित्यिक ‘वीर’ आज दिसत नाहीत व जे आहेत त्यांना नयनतारांप्रमाणे रोखले जाते. नयनतारा या अमराठी आहेत म्हणून त्यांना विरोध करणारे स्थानिक राजकीय पक्ष शेवटी कुणाच्या तरी हातचे बाहुले बनूनच विरोध करीत होते. नयनतारांचे कुळ व मूळ मराठी व कोकणातले आहे. इंदिरा गांधींच्या आत्याबाई विजयालक्ष्मी पंडितांच्या त्या कन्या. वडील बॅ. रणजित सीताराम पंडित हे साहित्य संस्कृतीचे गाढे अभ्यासक. कोकणातील कुडाळ हे त्यांचे गाव. मुख्य म्हणजे ज्या नयनतारांची आजच्या राज्यकर्त्यांना भीती वाटते त्या नयनतारांनी आणीबाणीत इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवला होता व त्याबद्दल त्यांना अटकही झाली होती. म्हणजेच त्या एखाद्या राजकीय पक्षाच्या व विचारसरणीच्या विरोधात नसून जे भंपक, खोटे व अतिरेकी आहे त्या विरोधात आहेत. त्यामुळे यवतमाळ साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून त्यांनी आपली परखड मते मांडलीच असती.
गोवंश, गोमांसावरून होणाऱ्या हत्या, द्वेषाचे राजकारण, राजकीय सूडासाठी वापरली जात असलेली सरकारी यंत्रणा, पत्रकारांवरील राजकीय दबाव, लेखकांचे दिवसाढवळय़ा पडणारे खून याबद्दल प्रत्येक नागरिकाला लाज वाटायला हवी, असे मत श्रीमती सहगल यांनी त्यांच्या छापील भाषणात व्यक्त केले व ते त्यांनी आधीच संमेलनाच्या आयोजकांकडे पाठविले. त्यामुळे नयनतारा यांनी संमेलनास येणे म्हणजे सरकारी मेहेरबानीस मुकणे असा व्यापारी विचार संमेलन आयोजकांनी केलेला दिसतो. नयनतारा व्यासपीठावर आहेत म्हणून कदाचित मुख्यमंत्री महाशयांनी येण्याचे टाळले असते. त्यामुळे नयनतारा यांनाच टाळून लेखक-साहित्यिकांनी स्वाभिमान व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून आपल्याच हातांनी केला.
Post A Comment:
0 comments so far,add yours