आयटी हब, ऑटोमोबाईल हब, शिक्षण,  संस्कृती, कला या गोष्टींमुळे पुणे जगात ओळखलं जातं. या गोष्टींसोबतच पुण्याची आणखी एक ओळख आहे आणि ती म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. याच पुण्यात लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती बाहेर आणला आणि त्याला उत्सवाचं रूप दिलं. हा उत्सव आता महाराष्ट्राची ओळख बनलाय. पुणे म्हटलं की गणेशोत्सव आणि पुण्यातला गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यासमोर एकच नाव येतं आणि ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. इथं श्रीमंती फक्त नावातच नाही तर ती मंडळाच्या प्रत्यक्ष कामातही आहे आणि दिसण्यातही आहे. दगडूशेठ मंडळाचं प्रत्येक काम भव्य-दिव्य आणि उच्च प्रतिचं. बाप्पांच्या सर्वांगसुंदर मूर्तीसमोर नतमस्तक होणारा प्रत्येक जण क्षणभर आपलं दु:ख विसरून जातो. भव्य देखावे, आकर्षक रोषणाई, प्रत्येक कामाला विधायकतेची जोड असते. मंदिरं ही फक्त देवालयं न राहता मानवतेची मंदिरं बनावी हा विचार प्रत्यक्षात आणण्याचं काम हे मंडळ गेली अनेक दशकं करत आहे.
यावर्षी सूर्यमंदिराचा देखावा
दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ यंदा सुर्यमंदिराचा देखावा साकारत आहे.देशात पुरी येथील कोणार्क मंदिरांसह 5 ठिकाणी सूर्य मंदिरे आहेत. त्यांचा एकत्रित विचार करून हे मंदिर साकारलं जाणार आहे. गेले 3 महिने सजावटकार आणि कामगार अहोरात्र काम करत आहेत. दिवसा सूर्याच्या प्रकाशात आणि रात्री विद्युत रोषणाईत हे मंदिर उजळून जाणार आहे असं सजावटकार विवेक खटावकर यांनी सांगितलं. या देखाव्याचं उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 2 सप्टेंबरला होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 8. 30 ला श्रींची प्राण प्रतिष्ठेची मिरवणूक असेल. 11 वाजून 10 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
3 सप्टेंबरला ऋषी पंचमी दिनी पहाटे 31 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण होईल. विसर्जन मिरवणूक 12 सप्टेंबरला  विकट विनायक रथातून निघेल अशी माहिती प्रमुख विश्वस्त अशोक गोडसे यांनी दिलीय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours