मुंबई, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाला बहुमतासाठीच्या जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आता भाजप - शिवसेनेच्या वाटाघाटींमध्ये नेमकं काय ठरतंय याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
सत्तास्थापनेसाठीच्या वाटाघाटींमध्ये भाजप - शिवसेनेत कायकाय राजकीय नाट्य घडतं हेही पाहावं लागेल. उद्धव ठाकरे त्यांच्या 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनीही 15 बंडखोर आपल्या संपर्कात असल्याचं भाष्य केलं आहे. आकड्यांच्या या खेळात सत्तास्थापनेच्या 3 शक्यता आहेत.
1. भाजप आणि शिवसेनेने युतीधर्म पाळून एकत्र सत्ता स्थापन करणं
भाजप आणि शिवसेनेने निवडणुकीआधीच युती केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत 'आमचं ठरलंय' असं सांगून यशस्वी वाटाघाटींची हमी देत होते. उद्धव ठाकरे म्हणतात तसं ठरल्याप्रमाणे झालं तर राज्यात महायुतीची सत्ता येईल. त्यातही अडीच-अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाचं काय, सेनेसमोर उपमुख्यमंत्रिपदाचा पर्याय ठेवला जाईल का? शिवसेनेला सत्तेत समान वाटा मिळेल का हे प्रश्न आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपला 122 जागा होत्या तर शिवसेनेकडे 63 जागा होत्या. यावेळी मात्र भाजपला 100 हून थोड्याच जास्त जागा मिळाल्या आहेत. त्या तुलनेत शिवसेनेचं नुकसान झालेलं नाही.त्यामुळे शिवसेनेचा वाटाघाटींमध्ये वरचष्मा असू शकतो.
2. शिवसेनेची काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीशी सलगी
सत्तास्थापनेचा दुसरा पर्याय आहे शिवसेना आणि काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने एकत्र येण्याचा. राष्ट्रवादीला यावेळी 54 जागा मिळाल्या तर काँग्रेसकडे 45 जागा आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी चांगली झालीय. त्यामुळे हे 3 पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात. हा पर्याय काँग्रेससाठी फायद्याचा आहे.
3. भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार
सत्तास्थापनेच्या वाटाघाटींमध्ये शिवसेनेने खूपच मागण्या केल्या तर भाजपपुढे राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवण्याचाही पर्याय आहे. शरद पवारांनी आतापर्यंत अनेक आघाड्या जमवल्या आहेत, सरकारस्थापनेचा त्यांचा अनुभवही दांडगा आहे. अशा स्थितीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचा पर्यायही नाकारता येणार नाही, असं एका भाजप नेत्याने सांगितलं.
सत्तेचा सारीपाट
महाराष्ट्राच्या या निकालांचे भाजप - शिवसेनेच्या संबंधांवर कसे परिणाम होतील हा या निवडणुकीतला कळीचा मुद्दा आहे. 2014 च्या निवडणुकीत सेना आणि भाजपमध्ये मोठा भाऊ कोण? ही स्पर्धा लागली होती.
मागच्या वेळचा अनुभव लक्षात घेता शिवसेनेने वेळोवेळी भाजपवर टीका केली आहे. त्यामुळे महायुतीत सगळं काही आलबेल आहे, असं नाही. तेच चित्र आघाडीमध्ये आहे. शरद पवारांना राज्यात विरोधी पक्षाचा चेहरा बनणं महत्त्वाचं होतं. काँग्रेसला स्वत:ची अशी ओळख राहिली नसल्यामुळे काँग्रेसपेक्षा वरचढ ठरणं आणि ती जागा टिकवून ठेवणं याला त्यांचं प्राधान्य आहे. ऐन दिवाळीमध्ये राज्यात सत्तेचा हा सारीपाट रंगणार आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली, असंच म्हणावं लागेल.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours