 खाजगी डॉक्टरांनी सज्ज रहावे
 डॉक्टर संघटनेबाबत बैठक
 साधनं व स्टाफ तयार ठेवावा
 सेवानिवृत्त डॉक्टरांची यादी करा
 आयएमएच्या स्वयंसेवकांची यादी घ्या
 हॉस्पिटचे ओळखपत्र ग्राहय धरणार  
जिल्हा प्रतिनिधि शमीम आकबानी
            भंडारा,दि. 23 :- कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करत असून अपात्कालीन परिस्थिती उदभवल्यास शहरातील व जिल्हयातील खाजगी हॉस्पिटल व डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित करण्यात येतील. कोराना रोगाच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी साधन सामुग्री व डॉक्टर तथा नर्सेसचा स्टाफ सज्ज ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी केले.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयएमएने सहकार्य करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, निवासी उपिजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद मोटघरे, डॉ. नितीन तुरस्कर तसेच खाजगी  वैद्यकीय संस्थाचे प्रमुख उपस्थित होते.
खाजगी डॉक्टारांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध व्हेंटीलेटर  व प्रशिक्षित स्टॉफ गरज भासल्यास उपलब्ध करुन दयावेत.  व्हेटीलेटर  योग्य हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्याची प्रशासनाची तयारी आहे मात्र शक्यतो प्रशिक्षित स्टॉफ उपलब्ध करुन दिल्यास अधिक सोयीचे होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 
जिल्हा प्रशासनाने जिल्हा तसेच तालुकास्तरावर शीघ्र प्रतिसाद पथकाची स्थापना केली असून हे पथक परदेशातून परत येणाऱ्या नागरिकांच्या वास्तव्य असलेल्या ठिकाणास भेट देण्याची काम करीत आहेत. त्याच प्रमाणे डॉक्टरांची चमु सुध्दा यासाठी सज्ज आहे. संपर्कात आलेल्या व्यक्ती ज्या कार्यक्षेत्रात राहत असतील त्या ठिकाणचे पर्यवेक्षक दैनंदिन अहवाल आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सादर करणार आहेत. प्रशासनाने वातानुकूलित बसेस या पूर्वीच बंद केल्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्हयात कलम 144 लागू करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर करोना साथरोग आटोक्यात ठेवण्यासाठी मोठया प्रमाणावर वैद्यकीय मनुष्यबळ लागणार आहे. अशावेळी खाजगी रुग्णालय व डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करण्याची वेळ आल्यास डॉक्टरांनी सज्ज रहावे, असे आवाहन त्यांनी केले. बसस्थानक व रेल्वेस्थानकावर तपासणी चमु नेमण्यात आली असून स्वतंत्र्य करोना वार्ड तयार करण्यात येत आहे. खाजगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित केल्यास त्यांना त्यांच्या हॉस्पिटलच्या ओळखपत्रावरच प्रवेश देण्याच्या सूचना पोलीसांना देण्यात येतील. सेवानिवृत्त डॉक्टर्स व नर्स तसेच आयएमएच्या स्वयंसेवकांची यादी तयार करण्यात यावी. त्यांनाही याबाबत सूचना दयाव्यात, असे ते म्हणाले. 
जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अपात्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या व्यतिरिक्तही शासनास सहकार्य लागल्यास देण्याचे आश्वासन आयएमएने दिले. 
कोरोनाबाधित व्यक्तीने,  त्यांची सुश्रूषा करणाऱ्या व्यक्तीने, निकट सहवासितांनी घरातील सुश्रूषे दरम्यान वापरलेले मास्क 5 टक्के ब्लिच सोल्युशेन किंवा 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जंतुक करुन त्याची जाळून विल्हेवाट लावण्यात यावी. वापरलेला मास्क हा जंतुसंसर्ग युक्त समजावा. अशा व्यक्तींना जर खोकला, ताप, श्र्वसनाचा त्रास, धाप लागणे अशी लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी 07184-252247, 07184-252317, जिल्हा नियंत्रण कक्ष 07184-251222 किंवा पोलीस विभागाशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours