- संपादिका..सुनिता सुरज परदेशी
शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचा सवाल
साडीचोळी देऊन शेतकरी विधवांची थट्टा करू नका
यवतमाळ : स्वखुशीच्या गोंडस नावाखाली अ.भा. मराठी साहित्य संमेलनात काही अपवाद वगळता पैसे देणा-या साहित्यीकांनाच स्थान देण्यात आल्याचे तथ्य पुढे आले आहे. आता हे साहित्य संमेलन अखिल भारतीय नसून ‘प्रायोजीत’ साहित्य संमेलन झाले असल्याचा आरोप शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केला आहे.
साहित्य संमेलनात सहभागी होणा-या कवी व साहित्यीकांकडूनही मोठ्या प्रमाणात वसूली करण्यात आली आहे. व-हाडी बोली कवी संमेलनात सहभागी होणा-या बहुतांश कवींकडून प्रत्येकी ११ हजार रूपये घेण्यात आले आहेत. तसेच परिसंवादामध्ये सहभागी साहित्यीक व संचालकांनीही प्रत्येकी ११ हजार रूपये दिले आहे. तर कवी कट्टा काव्यसंमेलनात सहभागी कवींना प्रत्येकी ३ हजार रूपये आकारण्यात आले आहेत.
विदर्भात व त्यातही शेतक-यांच्या आत्महत्यांची दु:खतप्त भुमी असलेल्या यवतमाळ शहरात हे संमेलन होत असतांना विदर्भाच्या नामवंत साहित्यीकांना या संमेलनात डावलण्यात आले आहे. प्रख्यात व-हाडी कवी प्रा. विठ्ठल वाघ, डॉ.महेश एलकुंचवार, शेतक-यांच्या समस्यांवर ‘गोष्ट छोटी डोंगराएवढ़ी’ सारखा चित्रपट काढणारे साहित्यीक श्याम पेठकर, ज्यांचे साहित्य आंतरराष्ट्रीय पातळीवर अभ्यासाला आहे असे ख्यातनाम साहित्यीक माधव सरकुंडे, बि-हाडकार अशोक पवार, डॉ. किशोर सानप, शेतक-यांवर दिर्घकाव्य लिहिणारे कवी हेमंतकुमार कांबळे यांच्यासह या भुमीतल्या अनेक गाजलेल्या साहित्यीकांना या संमेलनातून वगळण्यात आले आहे. एकंदरीतच हे साहित्य संमेलन सर्वार्थाने ‘प्रायोजीत’ संमेलन झाल्याने प्रतिभावंत साहित्यीकांना बाजुला ठेवण्यात आल्याचा आरोप देवानंद पवार यांनी केला आहे. ज्या साहित्यीकांकडून संमेलनात सहभागी होण्यासाठी पैसे आकारण्यात आले त्यांना आता मानधन, प्रवासखर्च व निवास व्यवस्था करण्याची काय गरज आहे असा सवाल पवार यांनी केला.
अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे नेतृत्व विदर्भाकडे असतांना विदर्भात होत असलेल्या साहित्य संमेलनाची नैतिक व साहित्यीक दृष्टीने इतकी दयनीय अवस्था व्हावी हे दुर्दैव आहे. अखिल भारतीय स्तरावरील या भव्य कार्यक्रमाच्या दर्जाबाबतही आता शंका उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले.
सभामंडप, जेवणावळी व विवीध कार्यक्रम दात्यांकडून प्रायोजीत असतांना अ.भा.मराठी साहित्य संमेलनासाठी वर्गणी का वसूल करण्यात येत आहे असा सवाल शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केला आहे. साहित्य संमेलनाच्या भव्य सभामंडपाचा सुमारे दिड कोटी रूपये खर्च स्वागताध्यक्ष ना.मदन येरावार देणार आहेत. सहा वेळच्या जेवणाचा खर्च विवीध दात्यांकडून प्रायोजीत आहे. शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानाकडून मोठ्या प्रमाणात धान्य देण्यात येणार आहे. निवासासाठी रेमंड कंपनीचे विश्रामगृह, शासकीय विश्रामगृह, मंगल कार्यालये व काही हॉटेल्स मोफत किंवा नाममात्र दरात उपलब्ध झाले आहेत. ६ हजार ५०० रूपयाप्रमाणे २२० गाळ्यांचे भाडे तब्बल १४ लाख ३० हजार रूपये गोळा होणार आहेत. स्मरणिका आणी निमंत्रण पत्रिका जाहिरातदारांकडून प्राप्त निधीतून छापल्या गेल्या आहेत. जवळपास सर्वच खर्च प्रायोजकांकडून होत असल्याने विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील सर्वच स्तरातून वर्गणी का गोळा करण्यात येत आहे, व शासनानेही एवढी भरीव रक्कम संमेलनासाठी खर्च करण्याची आता आवश्यकता नाही असे ते म्हणाले.
शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने घेतलेल्या भुमिकेनंतर सारवासारव करून आयोजकांनी संमेलनात काही आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्याचा घाट घातला आहे. हि बाब अत्यंत निषेधार्ह असून कोट्यवधींचा अवास्तव खर्च होत असलेल्या कार्यक्रमात शेतकरी विधवांना साडी चोळी देणे म्हणजे त्यांच्या परिस्थितीची क्रूर थट्टा आहे. भरीव मदत न देता साडीचोळीवर त्यांची बोळवण करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये असे आवाहन पवार यांनी केले. वर्षभरात जिल्ह्यात सुमारे २४८ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यापैकी केवळ ४० आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरल्या. त्यामुळे इतर २०८ शेतकरी कुटूंबांना प्रत्येकी १ लाख रूपयांची मदत साहित्य संमेलनाच्या माध्यमातून झाली पाहिजे अशी मागणी देवानंद पवार यांनी केली.
मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजी साहित्यीक कशाला?
एकीकडे अ.भा.मराठी साहित्य महामंडळ मराठी भाषा जतन आणी संवर्धनाच्या गप्पा करतात आणि दुसरीकडे मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी इंग्रजी साहित्यीकाला निमंत्रीत केल्या जाते. हा मोठा विरोधाभास आहे. अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी ख्यातनाम इंग्रजी साहित्यीक नयनतारा सहगल यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. सहगल यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान अमुल्य आहे. त्यांच्या महानतेबद्दल कोणालाच शंका नाही. त्या सन्माननीय आहेत. मात्र मराठी भाषा साहित्याच्या महापर्वाच्या उद्घाटनाला इंग्रजी साहित्यीक हा विषय पचनी पडणारा नाही. मराठी हिताची मागणी मराठी भाषीकांसाठी करणारे मराठी साहित्य महामंडळ उद्घाटनासाठी मराठी साहित्यीकांना डावलतात हि गोष्ट मराठी साहित्यासाठी भुषणावह नाही. नयनतारा सहगल इंग्रजीतून भाषण करणार असून दुभाषकाद्वारे त्याचे भाषांतर उपस्थितांना सांगण्यात येणार आहे. ग्रामिण बोलीभाषाबहुल भागात इंग्रजीतील संबोधन हा चमत्कारीक विषय आहे. मराठी भाषेचा हा घोर अपमान असून तो कदापीही सहन केल्या जाणार नाही. सतत मराठीपणाचा पुरस्कार करणारे पक्षही यावर मुग गिळून गप्प आहेत असा आरोप देवानंद पवार यांनी केला.
Post A Comment:
0 comments so far,add yours