प्रीती बारिया खून प्रकरण
भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ३० जून रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. भंडारा जिल्ह्यातील चर्चित प्रीती बारिया खून प्रकरणी त्यांनी हा निकाल दिला आहे. अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत अशी या दोन आरोपींची नावे आहेत.
३० जुलै २०१५ रोजी या दोघांनी दुपारच्या सुमारास म्हाडा कॉलनीतील रविंद्र शिंदे यांच्या घरी त्यांची मुलगी अश्विनी एकटी असल्याचे पाहून एसी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार केले होते. तेव्हापासून अश्विनीला कायमचे अपंगत्व आले आहे. त्याच रात्री या दोघांनी तकिया वॉर्ड येथील रुपेश बारिया यांच्याही घरी एसी दुरुस्तीच्या मिषाने प्रवेश केला. घरात असलेल्या त्यांच्या पत्नी प्रीती बारिया (३०) यांच्या डोक्यावर हातोडीने वार करून त्यांना ठार केले. त्यांचा मुलगा भव्य (९) हा या ठिकाणी आला असता त्याच्याही डोक्यावर जोरदार वार केल्याने त्यालाही कायमचे अपंगत्व आले आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी दोन्ही आरोपींना शनिवारी दुपारी १ वाजता शिक्षा सुनावली. यात अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांना भादंवि ३०७ कलमान्वये फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
याप्रकरणी भंडारा पोलिसांनी अटक करून आरोपींविरूद्ध भादंवि ३०२, ३०७, ३९७, ४५२ कलमान्वये गुन्हे नोंदविले होते. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाची अंतिम सुनावणी शनिवारला झाली. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांच्या न्यायालयात २६ साक्षदर तपासले. दोष सिद्ध झाल्यामुळे शिक्षा सुनावण्यात आली.
Post A Comment:
0 comments so far,add yours