बीड, 10 मे : चारा छावणीत भ्रष्टाचार केल्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या चारा छावणीत तब्बल 800 बोगस जनावरे दाखवण्यात आली होती. प्रशासनाने या भ्रष्ट शिवसेना जिल्हाप्रमुखाचे पितळ उघडे पाडत कारवाई केली आहे.
बीड तालुक्यातील कोल्हारवाडी इथल्या चारा छावणीला उपजिल्हाधिकार्‍यांच्या तपास पथकानं भेट दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुखानं छावणीतील काळेबेरे उघड होऊ नये म्हणून छावणी तपासणीसाठी आलेल्या महिला उपजिल्हाधिकार्‍यांच्या पथकाला तपासणीपासून तासभर रोखलं. तसंच त्यांच्याशी हुज्जतही घातली.
माजलगावच्या उपविभागीय अधिकारी शोभा जाधव या कोल्हारवाडी येथील छावणी तपासणीसाठी गेल्या असता त्यांना रोखण्यात आले. छावणी ‘मत्स्यगंधा’ सेवाभावी संस्थेमार्फत चालवली जात असली तरी प्रत्यक्षात छावणी चालक हा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे. विशेष म्हणजे छावणीची तपासणी होऊ नये यासाठी तेथील विद्युत पुरवठा तोडण्यात आला. यासंदर्भात उपविभागीय अधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने पोलीस उपअधीक्षकांसह मोठा फौजफाटा छावणीवर पाठवला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात छावणीची तपासणी करण्यात आली. यावेळी छावणीत बोगस जनावरं दाखवल्याचं उघड झालं आहे.

महिला अधिकाऱ्याला छावणी तपासणीपासून गुरूवारी रात्री 8.30 च्या सुमारास तब्बल तासभर रोखल्याचे उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी तक्रारीत म्हटलं आहे. छावणी चालकाच्या या मुजोरीनंतर पोलीस बंदोबस्तात छावणीची तपासणी करत या नेत्याचं पितळ उघडे पाडले. 3 मार्चला सुरु झालेल्या या छावणीत काही दिवसातच जनावरांचा आकडा 1600 वर पोचल्याचे अहवाल सांगण्यात आलं आहे. या छावणीत 30 आणि 31 मार्च रोजी प्रत्येकी 1612 जनावरांची नोंद आहे. 1 एप्रिल रोजी सकाळीच म्हणजे तलाठ्यांनी अहवाल देण्याअगोदरच अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी या छावणीला भेट दिली होती. त्यादिवशीची जनावरांची संख्या थेट 871 इतकी नोंदवण्यात आली. म्हणजे एका रात्रीत तब्बल 741 जनावरे कमी झाली.
एका रात्रीतून इतकी जनावरे गेली कुठे आणि कशी या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाला अद्याप छावणी चालकांनी दिलेले नाही. 6 मे रोजी पुन्हा जनावरांच्या आकड्याने 1607 ही संख्या गाठली आहे. आजचा आकडा 1600 च्या घरात आहे. मात्र प्रत्यक्ष 800जनावरे दिसून आली आणि बोगसगिरी उघड झाली. विशेष म्हणजे या "मत्स्यगंधा" संस्थेला तब्बल 15 छावण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राजकीय वजन वापरून भ्रष्टाचार करणाऱ्या य मुजोर चारा छावणीचा चालक शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या संस्थेवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours