नवी दिल्ली, 26 सप्टेंबर: विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाला असून लवकरच युतीची घोषणा केल्या जाणार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप 144, शिवसेना 126 तर मित्रपक्षाला 18 जागा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
असा आहे नवा फॉर्म्युला..
भाजप- 144
शिवसेना- 126
इतर मित्र पक्ष -18
एकूण जागा- 288
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमेटीची बैठक गुरूवारी सायंकाळी दिल्लीत झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, बी. एल. संतोष, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगल प्रभात लोढा, व्ही. सतीश, राज्य संघटक विजय पुराणिक आदी नेते उपस्थित होते. आजच्या बैठकीमध्ये जवळपास 112 उमेदवारांच्या नावांवर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीनंतर निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी पुन्हा एक बैठक होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
भाजपच्या नावांवर चर्चा करण्याबरोबरच 'युती'च्या जागावाटपाचा तिढा देखील या बैठकीत सोडवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातही युतीवरून एकमत झाले असून लवकरच युतीची घोषणा करण्यात येणार आहे. मात्र, शिवसेनेकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
तयार होतोय प्रचाराचा 'मास्टर प्लान'
भाजपच्या कोअर कमेटीच्या बैठकीत निवडणूक प्रचाराच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. निवडणूक महाराष्ट्रात होत आहे, पण भाजपच्या प्रचाराचा 'मास्टर प्लान' दिल्लीत तयार करण्यात येत आहे. प्रचाराचे मुद्दे, विरोधकांवर करण्याचा हल्लाबोल आणि इतर रणनीतीवर या बैठकीत आराखडा तयार करण्यात येणार आहे.
दरम्यान, जागावाटपात 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम होता. भाजपकडून चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन तर शिवसेनेकडून सुभाष देसाई यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. तरीही शिवसेनेला कमी जागा मान्य नव्हत्या. बदलती राजकीय परिस्थिती इतर पक्षांमधल्या नेत्यांचे भाजपमध्ये येणे. लोकसभेनंतर वाढलेली ताकद यामुळे जास्त जागा मिळाव्यात, या मागणीवर भाजप नेते ठाम आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours