श्री. दिवसे यांना भावपूर्ण निरोप
नवे जिल्हाधिकारी शांतनु गोयल रुजू
रिपोर्टर: सजिव भंडारा शहर
भंडारा,दि.7 :- 1 एप्रिल 2017 रोजी भंडारा जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले सुहास दिवसे यांनी आपल्या कार्यकतृत्वाने जिल्हयावर ठसा उमटविला. कुशल प्रशासक, अभ्यासू व्यक्तीमत्व, भाषण कौशल्य, सामान्य माणसाशी जूळलेली नाळ तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांना कुटूंब प्रमुखाची वागणूक यामुळे सुहास दिवसे यांनी अल्पावधीतच जिल्हाधिकारी ते दिलदार अधिकारी अशी छाप जिल्हावासियांवर सोडली. आज त्यांना नवीन जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांचे प्रमुख उपस्थितीत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भावपूर्ण निरोप दिला. सुहास दिवसे यांचे काम प्रेरणादायी असून त्यांच्या कार्यकौशल्याचा वारसा यापूढेही चालू राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी निरोप समारंभात दिली.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना आज एका छोटेखानी समारंभात भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, उपवन संरक्षक विवेक होशिंग, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, स्मिता पाटील, अर्चना मोरे, शिल्पा सोनाले व सर्व तहसिलदार आणि अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांच्या हस्ते सुहास दिवसे यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात जिल्हाधिकारी म्हणून सुहास दिवसे यांनी जिल्हयाच्या विकासासाठी अनेक चांगले निर्णय घेतले. समतोल शाश्वत विकासाच्या दृष्टीने भंडारा जिल्हयाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करुन अंमलबजावणी सुरु केली. आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी मनरेगा प्लस ही संकल्पना त्यांनी मांडली. यास शासनानी सकारात्मक प्रतिसाद दिला. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणी व प्रशिक्षणावर भर देवून सक्षम प्रशासन ही संकल्पना त्यांनी जिल्हयात रुजू केली. शिक्षणाला नवी उर्जा देण्यासाठी व बालवयापासून विद्यार्थ्यांवर संस्कार रुजविण्यासाठी जिल्हाहधकारी सुहास दिवसे यांनी 21 कौशल्य व 10 मुल्य असलेला सक्षम हा उपक्रम जिल्हयात राबविला याउपक्रमांतर्गत अनेक शिक्षकांना प्रशिक्षीत करुन जिल्हयाच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम सुहास दिवसे यांनी केले, अशा शब्दात अनेक मान्यवरांनी सुहास दिवसे यांच्या कार्याची कौतुक केले.
पोलीस विभागाने सुरु केलेल्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमास सुहास दिवसे यांनी भरपूर पाठिंबा दिला. या कामाची प्रसंशा केल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी सांगितले. पोलीस व जिल्हा प्रशासनामध्ये उत्तम समन्वय ठेवण्याचे काम श्री. दिवसे यांनी केल्याचे त्यांनी आर्वजून नमूद केले. उत्तम वक्ता, उत्तम प्रशासक व दुरदृष्टी असलेला अधिकारी अशी सुहास दिवसे यांची प्रतिमा असून त्यांच्यामुळे प्रशासन गतीमान झाले व विकासाला चालना मिळाली, असे उदगार उपवन संरक्षक विवेक होशिंग यांनी काढले. मेमो व नोटीस यावर विश्वास न ठेवता संवादाने प्रश्न सोडवा यावर दिवसे यांनी अधिक भर दिल्याचे होशिंग यांनी नमूद केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, तहसिलदार मोहाडी सुर्यकांत पाटील, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे व महसूल संघटनेचे किशोर राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन अभिषेक नामदार यांनी केले तर उपस्थितांचे आभार तहसिलदार संजय पवार यांनी मानले.
व्हिजन समोर ठेवून जिल्हयाचा विकास करा – सुहास दिवसे
भंडारा समृध्द आणि उत्तम जिल्हा असून या ठिकाणचे लोक अतिशय चांगले आहेत. लोकांच्या अपेक्षा सुध्दा कमी आहेत. विदर्भातील माणूसच मुळात साधा असून इतर माणसांना आपले करणारा आहे. भंडारा जिल्हयासाठी जिल्हा प्रशासनाने व्हिजन तयार केले असून हे व्हिजन डोळयासमोर ठेवून कार्य करावे, असे सुहास दिवसे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले. आपण आपल्या कार्यकाळावर समाधानी असून आणखी एखादे वर्ष जिल्हयात काम करण्याची इच्छा होती, असे ते म्हणाले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त वातावरणात काम करावे. उत्तम आरोग्य ठेवा, खुप वाचन करा, मनोबल व स्वास्थ चांगले ठेवा, असा सल्ला देवून सुहास दिवसे यांनी भंडारावासियांचा निरोप घेतला.
Post A Comment:
0 comments so far,add yours