औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्च्याने पुकारलेल्या 9 आॅगस्ट रोजी महाराष्ट्र बंदमध्ये औरंगाबादचा कणा असलेल्या वाळूज एमआयडीसीमध्ये कंपन्यांची तोडफोड करण्यात आली होती. मराठा मोर्च्याच्या आंदोलकांनीच ही तोडफोड केल्याची बोललं जात होतं. पण आता औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी कंपन्यांमध्ये केलेली तोडफोड आणि जाळपोळ ही मराठा मोर्च्याच्या आंदोलकांनी केली नव्हती असा महत्त्वपूर्ण खुलासा केलाय. वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेली तोडफोड आणि मराठा आंदोलन याचा संबंध नाही. ही तोडफोड आंदोलनकर्ते यांनी केली नाही अशी माहिती  पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याशी बातचीत केली. चिरंजीव प्रसाद म्हणाले की, 9 आॅगस्ट रोजी वाळूज एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. याचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे. या फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. या फुटेजमध्ये दिसणारे तरुण हे हातात भगवा झेंडा आणि तोंडावर रुमाल लावून तोडफोड करत आहे. त्यादिवशी आंदोलक हे रस्त्यावर आंदोलन करत होते. त्यामुळे त्यांचा या तोडफोडीशी संबंध नाही. ज्या लोकांनीही तोडफोड केली त्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंध आहे अशी माहिती प्रसाद यांनी दिली.
काय घडलं होतं 9 आॅगस्टला ?
मराठा आरक्षणासाठी 09 ऑगस्ट 2018ला दुसऱ्यांदा महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला होता. या बंदला सगळ्याच ठिकाणावरून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.  औरंगाबादमध्ये वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये जमावाने प्रचंड नासधूस केली. कंपन्यांमध्ये घुसून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. वाळूजमधील स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांना याचा जवळपास 50 कोटींचा फटका बसला होता.
वाळूज भागातील एफ सेक्टरमध्ये जवळपास 65 ते 70 कंपन्यांची नासाधून केली होती. झुंडीने आलेल्या जमावाने सर्वप्रथम कंपनीमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीची आधी तोडफोड केली आणि त्यानंतर आतमध्ये घुसून कॅम्प्युटर्स आणि फर्निचरपर्यंत सगळ्याची तोडफोड केली. काही कंपनीच्या स्वागत कक्षाला आगी सुद्धा लावण्यात आल्या. रस्त्यावरच्या खाजगी गाड्यांनाही आग लावण्यात आल्या. यात  9 गाड्या जाळून खाक झाल्यात. इतकंच नाही लावलेली आग विझवण्यासाठी आलेली अग्निशमन दलाची गाडीही जमावाने पेटवून दिली. जमावाच्या हल्ल्यातून पोलिसांच्या गाड्याही सुटल्या नाही. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचीही गाडी जमावाने फोडली.
 समाजकंटकांमुळेच हिंसाचार, यापुढचं आंदोलन शांततेनेच होणार
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आता यापुढे रस्त्यावर नाही तर शांततेनेच आंदोलन करू, आंदोलनात झालेला हिंसाचार हा काही समाजकंटकांनी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी केला असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने केला. पुणे जिल्हा समन्वय समितीने 10 आॅगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. औरंगाबादमधल्या वाळूंज एम.आय.डी.सी परिसरात आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तोडफोड प्रकरणीही समितीने आपली भूमिका स्पष्ट केली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात फक्त काच फुटली होती. त्यामुळे झालेलं नुकसान हे समन्वय समितीच्या वतीन भरून देण्यात येईल असं समितीच्या वतीने स्पष्ट केलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours