मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यभरात उमटलेल्या हिंसक आंदोलनांची दखल घेत मुंबई हायकोर्टात उद्या मराठा आरक्षणा संदर्भात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यभरातील आंदोलनांची बाब कोर्टाच्या नजरेस आणून दिली आहे, तसेच आत्तापर्यंत सात तरूणांनी आत्महत्या केल्याचीही माहीती पाटील यांनी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिली होती. त्यामुळे याचिकेवरील सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने उद्या या प्रकरणाची सुनावणी घ्यायचं ठरवलंय. हायकोर्टानं राज्य सरकारला ३१ जुलैपर्यंत राज्य मागासप्रवर्ग आयोगानं केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आत घ्यावा जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात डिसेंबर २०१७ मध्ये दाखल करण्यात आलीय. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठापुढे यावर उद्या सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक महिन्यांपासून मागास प्रवर्ग आयोगाकडे प्रलंबित आहे. याबाबत अद्याप कुठलंही ठोस काम दिसत नसल्याने आयोगाने व राज्य सरकारने तात्काळ व वेळमर्यादेच्या आत पडताळणी करून मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने लावावा व त्याकरिता वेळ मर्यादा ही उच्च न्यायालयाने निश्चित करावी जेणेकरून येत्या शैक्षणिक वर्षात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल अशी प्रमुख मागणी या याचिकेत करण्यात आलीय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours