नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप झाला. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत ही बैठक सुरू होती. या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी 'अजेय भारत, अटल भाजप' चा नारा दिला. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजप विरूद्ध सर्व विरोधी पक्ष मिळून महाआघाडी तयार करण्याच्या हालचाली आहेत. त्याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी महाआघाडीच्या प्रयत्नांवर सडकून टीका केली.
पंतप्रधान म्हणाले भाजपने जे काम केलं आणि विजय मिळवला त्यामुळेच सर्व विरोधीपक्षांना एकत्र यावं लागलं. भाजपचं हेच खरं यश आहे.
ज्या पक्षांची धोरणं एकसाखी नाही, जे पक्ष एकत्र चालू शकत नाहीत, जे पक्ष एकमेकांकडे चांगल्या भावनेने पाहू शकत नाहीत ते पक्ष फक्त भाजपला विरोध करण्यासाठी एकत्र येत आहेत. त्यांचे हे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत.
काँग्रेस हा पक्ष फक्त खोटेपणावर निवडणूक लढतो. महाआघाडीकडे विचारधारा नाही, नेतृत्व नाही, नियत नाही आणि नीतीही नाही. असे लोक काय लोकांसमोर जाणार असा सवालही त्यांनी केला.
छोट्यातल्या छोटा पक्षही काँग्रेसचं नेतृत्व स्वीकार करत नाही आणि काँग्रेसपक्षातही हीच भावना असल्याचं पंतप्रधानांनी भाषणात सांगितल्याची माहिती रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या या बैठकीला सर्व ज्येष्ठ नेते, खासदार, सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री उपस्थित होते.
2019 च्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. देशातली राजकीय स्थिती, महाआघाडी आणि भाजपसमोरची संकट यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून भाजपाध्यक्ष अमित शहा 2019 चा मास्टप्लॅन तयार करणार आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours