मुंबई, 17 डिसेंबर : भाजप अध्यक्ष अमित शहा बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते भाजपच्या आमदार आणि खासदारांची बैठक घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षसंघटना मजबूत करणं आणि शिवसेनेला पुन्हा सोबत घेण्याची तयारी दर्शवणं, या नव्या प्लॅनसह भाजप पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आता सावध झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमित शहा हे त्यांच्या निवडणूक तंत्रासाठी ओळखले जातात. पण राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे महाराष्ट्रात असा फटका बसू नये, म्हणून ते तयारीला लागल्याचं चित्र आहे.

पक्षाची राजकीय यंत्रणा

अमित शहा हे मुंबई दौऱ्यात अनेक मुद्द्यांचा आढावा घेतील. त्यामध्ये भाजपची राज्यात असलेली राजकीय यंत्रणा हादेखील कळीचा विषय असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला यश मिळत असलं तरीही काही ठिकाणी फटका बसत आहे. त्यादृष्टीने राजकीय यंत्रणा कशी मजबूत करता येईल, याकडे शहा लक्ष देतील.

लोकसभा निवडणुकीचं नियोजन 
लोकसभा निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच लोकसभेच्या 48 जागा असलेला महाराष्ट्र भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीबाबतची रणनीती काय असावी, याबाबत अमित शहा कार्यकर्त्यांशी बोलतील.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उद्या (मंगळवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पक्षाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल होतील. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपच्या आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत, असं म्हणावं लागेल.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours