वरळी, 16 डिसेंबर : कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या कोळी बांधवांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली आहे. कोस्टल रोड हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आता शिवसेना आणि मनसेत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाचं आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पण या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. या मुद्द्यावर कोळी बांधवांनी काही दिवसांपूर्वी कृष्णकुंज या निवासस्थानी येऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. 
'कोळीवाड्यात येऊन आमचा या प्रकल्पाला विरोध का आहे, हे तुम्ही पाहा,' अशी विनंतीही कोळी बांधवांनी राज ठाकरेंना केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे कोळीवाड्यात गेले आहेत. यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी काही वेळात राज ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
'कोळी बांधव हे मुंबईचे मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या विरोधाला डावलून तुम्ही एखादा प्रकल्प त्यांच्या माथी मारू शकत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी याबाबत नीट विचार करावा,' अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर आता यावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावं लागेल.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours