मुंबई, 14 जानेवारी : सलग सातव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे मागील आठवडाभरापासून मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले आहेत. बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच संप सात दिवसांपर्यंत लांबला आहे.
संपावर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेली त्रिसदस्यीय समिती आज हायकोर्टात अहवाल सादर करणार आहे. त्यामुळं आज तरी बेस्ट संपावर तोडगा निघतो का, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपासाठी टीकेचे धनी ठरलेल्या उद्धव ठाकरेंनी अखेर मौन सौडलं आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या अवाजवी असल्याचा सूर शिवसेना पक्षप्रमुखांनी आळवला आहे. मात्र एकाही बेस्ट कर्मचाऱ्याची नोकरी जाऊ देणार नाही असा शब्ददेखील त्यांनी दिला आहे.
बेस्टच्या अर्थसंकल्पाचं मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलिनीकरण करण्याचं दिलेलं आश्वासन पूर्ण करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. दरम्यान ज्यांचा बेस्ट संपाशी संबंध नाही त्यांनी यात पडू नये अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours