मुंबई, 18 जानेवारी : बेस्ट कर्मचाऱ्यांना संपकाळातील गैरहजेरी भोवण्याची शक्यता आहे. कारण गैरहजेरीमुळे नियमानुसार संपकरी कर्मचाऱ्यांचे नऊ दिवसांचे वेतन कापण्याच्या हालचाली बेस्ट प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
बेस्ट प्रशासनाने याआधी कर्मचाऱ्यांचे वेतन कापणार नसल्याचे स्पष्ट केलं असलं तरीही संप काळातील गैरहजेरी मात्र कर्मचाऱ्यांना भोवणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन कापल्यास बेस्टचा बुडालेला महसूलही वसूल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेस्टचे 30 हजार कर्मचारी 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर गेले होते. नऊ दिवसांच्या या संपामुळे मुंबईकरांचे हाल झाले. याशिवाय बेस्ट उपक्रमाचे दररोज पावणे तीन ते तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. संपामुळे बेस्टला सुमारे 25 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
दरम्यान, बेस्ट कामगार संघटनांननी संप बुधवारी दुपारी मागे घेतल्यानंतर सायंकाळपासून बेस्टसेवा पूर्ववत झाली. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ज्युनियर ग्रेड कर्मचाऱ्यांना दहा टप्प्यांची वेतनवाढ, खासगीकरण न करण्याची ग्वाही, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मध्यस्थाची न्यायालयाकडून नियुक्ती आदी निर्णय घेण्यात आले. कर्मचाऱ्याला सेवेतून कमी केलं जाणार नाही आणि कोणाचेही वेतन कापले जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केल्याचे संघटनांनी सांगितले होते.
मात्र संप मागे घेताच बेस्ट प्रशासन संप काळात गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच गदा आणण्याचा विचार करत आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन कापले जाणार नाही, मात्र नऊ दिवस कामावर गैरहजर राहिल्याने त्या दिवसांचे वेतन दिले जाणार नाही, असे बेस्टमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours