मुंबई: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. असाच धक्कादायक निकाल मावळ लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळाला. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. पार्थ यांच्या रूपाने पवार कुटुंबाला गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर आता अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'जनतेनं दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं मी अभिनंदन करतो. यावेळी लोकांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पाठीमागे उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे,' अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिलं आहे.
'पार्थचा पराभव धक्कादायक'

'मावळमध्ये आम्ही प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळे आलेला निकाल हा धक्कादायक होता. पण फक्त इथंच नाही तर देशभरात लोकांनी भाजपला कौल दिला आहे. पण खचून न जाता आम्ही या भागाच्या विकासासाठी भविष्यातही प्रयत्न करू,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अजित पवारांनी सर्व शक्ती पणाला लावलेली असतानाही नेमका कोणत्या कारणामुळे पार्थ पवारांचा पराभव झाला, याची चर्चा आता सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून आपली उमेदवारी माघारी घेत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी देत असल्याचं सांगितलं. त्यानंतर पार्थ पवारांना मावळमधून राष्ट्रवादीने उमेदवारी देण्यात आली. पण राष्ट्रवादीसाठी अगोदरदेखील ही जागा प्रतिकूल ठरली होती.
शरद पवारांनीही ही जागा अवघड असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अजित पवारांनी मुलाला या मतदारसंघातून उतरवणं ही मोठी रिस्क आहे, अशी चर्चा सुरू झाली. पण अजित पवारांनी ही रिस्क घेण्यामागे काही गणितं समोर ठेवली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours