मुंबई: केंद्रातलं मंत्रिमंडळ आणि खातेवाटपानंतर आता राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राज्यातल्या मंत्रिमंडळाचा पावसाळी अधिवेशनापूर्वी,10 जूनला विस्तार होईल, अशी शक्यता आहे. 
या मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश आणि मंत्रिमंडळात वर्णी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच विजयसिंह मोहिते पाटील यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
भाजपची साथ
या दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपची वाट धरली. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. 
त्याचरोबर विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. 
आणखीही दोन नावं 
या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं. राज्यमंत्री मदन येरावार यांनाही कॅबिनेटपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. 
राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे, असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. विखे पाटील यांच्याकडे कोणतं खातं दिलं जाणार हे मात्र कळू शकलेलं नाही. 
नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
मंत्रिमंडळ विस्तारासोबतच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याचीही चर्चा आहे. रावसाहेब दानवे हे केंद्रात मंत्री झाल्यामुळे भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे. 
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचा हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा आहे. लोकसभेमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपची विधानसभेची तयारी सुरू झाली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours