नवी दिल्ली : केंद्र सरकारने लष्करात आज नव्या नियुक्त्यांची घोषणा केली. महाराष्ट्राचे सुपूत्र असलेले लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे लष्कराचे नवे उपप्रमुख असणार आहेत. नरवणे हे लेफ्टनंट जनरल डी. अंबू यांची जागा घेतील. अंबू हे 31 डिसेंबरला निवृत्त होणार आहेत.
नरवणे हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे नवे लष्कप्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. रावत हे 31 जानेवारीला निवृत्त होत आहेत. मात्र या नियुक्तीमुळे आता नरवणेंची ती संधी जाण्याची शक्यताही व्यक्त केलीय जातेय. आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत नरवणे यांनी लष्करातल्या विविध पदांवर आणि विविध भागांमध्ये उत्तम काम केलंय. मनोज नरवणे राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि भारतीय सैन्य अकादमीचे माजी विद्यार्धी आहेत. 1980 मध्ये त्यांनी शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या 7व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
काश्मीरमध्ये लष्कराला मोठं यश
जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी राबवलेल्या धडक अभियानाला मोठं यश आलंय. सुरक्षा दलाने मनधान जंगलात राबवलेल्या शोध मोहिमेत दहशतवाद्यांचं मोठं घबाड सापडलं. दाट जंगलात जमिनीखाली खोल दडवून ठेवलेला शस्त्रसाठा शोधण्यात पोलिसांना यश आलं. हा शस्त्रसाठा पाहून सुरक्षा दलालाही आश्चर्य वाटलं. काडतूसं, रायफल्स, ग्रेनेड, पिस्तुलं असा मोठा शस्त्रसाठा सुरक्षा दलानं हस्तगत केला.
जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराची दहशतवाद्यांविरुद्ध आक्रमक मोहीम सुरू आहे. गेल्या 18 महिन्यांमध्ये तब्बल 357 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलंय अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिलीय. गेल्या सहा महिन्यांममध्ये पाकिस्तानने 1170 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध सर्वच स्तरांमधून मोहिम सुरू केलीय. धडक कारवाई करणं, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रत्येक पातळीवर ही मोहिम सुरू आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours