मुंबई। विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची 'जन आशीर्वाद' यात्रा आज नाशिकमध्ये पोहोचली. आदित्य यांच्या यात्रेदरम्यान त्यांना हमखास प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे युतीचं राज्य पुन्हा आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? त्यामुळे आदित्यच आता प्रत्येक सभेत त्यावर आपलं मत व्यक्त करताहेत. मी मुख्यमंत्री बनावं याकरिता जन आशीर्वाद यात्रा नाही तर मला महाराष्ट्र  सुजलाम सुफलाम घडवायचा आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. या आधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर नेत्यांनी बोलू नये अशी तंबी दिली होती.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
मी मुख्यमंत्री बनावं याकरिता जन आशीर्वाद यात्रा नाही. मला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम घडवायचा आहे.1995 मध्ये नाशिकला शिवसेनेचे अधिवेशन झाले आणि शिवसेनेचं सरकार राज्यात आलं. मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा त्यासाठी नाशिकला आलोय.
शिवसेनेवर, सेनेच्या नेत्यांवर जनता प्रचंड प्रेमकरतेय. आपल्या कामानी, मेहनतीने महाराष्ट्र भगवा होणार. युतीची सत्ता पुन्हा येणार, दुष्काळ मुक्त, प्रदूषण मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. कार्यकर्त्यांची ताकद, उत्साह जल्लोश पुढे घेऊन जाणार आहे असं आदित्य यांनी सांगितलं.
'आदित्यच करणार नेतृत्व'
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आदित्य यांच्यासोत यात्रेत आहेत. मुख्यमंत्रिपदाबाबत आदित्य स्पष्ट भाष्य करत नसताना राऊत हे मात्र आदित्य यांनीच महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं सांगत आहेत.
राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी पाहिलेली अपूर्ण स्वप्न आज उद्धव आणि आदित्य ठाकरे पूर्ण करताहेत. नव्या दमानं, नव्या जोमानं आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत. याच नाशकातून आदित्य ठाकरे महाराष्ट्र पादाक्रांत करतील. आदित्य ठाकरे यांनी शिवसेना सरकार आणि तरुणांचं नेतृत्व करावं ही जनतेची ईच्छा आहे.
राज्यकर्ता कसा असावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे बाळासाहेब, उद्धव आणि आता आदित्य ठाकरे आहेत. यात्रेच्या निमित्त नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केलं.या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. भाजपकडून हा मतदारसंघ घ्या,अशीही शिवसैनिकांची आग्रही मागणी आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours