मुंबई, 2 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाष्य केलं आहे. 'राजकारणात नीतिमत्ता शिल्लक आहे. मुख्यमंत्र्यांची त्यासाठी धडपड सुरू आहे. काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेतून बरेच लोक भाजपच्या पक्क्या घरात प्रवेश करीत आहेत. ते सर्व कर्तबगार, कार्यमग्न लोक आहेत. आधीच्या धर्मशाळेत त्यांचे कार्य व कर्तबगारीस कुणी विचारीत नव्हते. आता नव्या घरात त्यांच्या कर्तृत्वाची गुढी अधिक उंचावेल. त्या सगळय़ांच्या कर्तबगारीस सलाम!', असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कधीकाळी शिवसेना सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीची वाट धरलेल्या नेत्यांवरही टीकास्त्र सोडलं आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
- मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्पष्टपणे जाहीर केले आहे की, भाजप म्हणजे काही धर्मशाळा नाही, जिथे कुणीही उठावे आणि यावे. हा जनतेचा पक्ष आहे. जे चांगले काम करतात त्यांचे स्वागत आहे. येणाऱयांचे कार्य, कर्तृत्व आणि स्थान पाहूनच पक्षात प्रवेश दिला जात आहे, असे मुख्यमंत्री सांगतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच हवा. म्हणजे आता काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या पक्षांतून जे लोक घेतले आहेत त्यांचे कार्य, कर्तृत्व आणि चारित्र्य चमकदार असल्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
- काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे पक्ष मधल्या काळात धर्मशाळाच झाल्या. त्या धर्मशाळेतील बरेच लोक भाजपच्या पक्क्या आणि कायमस्वरूपी घरात आले व मुख्यमंत्र्यांनी त्यांना घराच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम पार पाडला.
- भाजपमध्ये प्रवेश करताना म्हणे आमदार कोळंबकरांचे डोळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आठवणीने पाणावले व त्यांना टी.व्ही. कॅमेऱयासमोरच हुंदके फुटले. कोळंबकर हे शिवसेनेत आमदार व मंत्री होते. ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले व आता भाजपवासी झाले. शिवसेना सोडून मोठा कालखंड लोटला आहे. कोळंबकर विधानसभेची जी जागा लढवत आहेत ती ‘युती’मध्ये शिवसेनेच्या वाटय़ाला आहे. त्यांना शिवसेनाप्रमुखांविषयी इतकाच जिव्हाळा होता तर त्यांनी शिवसेनेची वाट धरायला हवी होती. त्यामुळे त्यांचे अश्रू कुणालाही विचलित करू शकत नाहीत. विरोधी आमदारांची कामे सत्ताधारी होऊ देत नाहीत म्हणून पक्ष बदलायचे या सबबी आता जुन्या झाल्या. अकोल्यात पिचड पिता-पुत्रांनी तोच विचार मांडला. नाईकांचेही तेच आणि चित्रा वाघ यांचे पती लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकल्याने त्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला.
- वाघ यांच्या पतींवरील भ्रष्टाचार व लाचलुचपतीचे आरोप मागे घेऊ व त्यांना ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित करू, अशी घोषणा सरकारने केल्याचे आम्ही तरी वाचलेले किंवा ऐकलेले नाही.
-मुख्यमंत्री म्हणतात की, भाजप म्हणजे धर्मशाळा नाही. भाजप हा एक तत्त्व, नीतिमत्ता, पारदर्शक विचारांचा पक्ष आहे. भाजप संघाला आणि संघटनेला महत्त्व देतो. राजकारणात काही गोष्टी अपरिहार्य ठरतात, पण ‘रंगुनी रंगात साऱया रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱया पाय माझा मोकळा’ असे अनेकदा वागावे लागते. फडणवीस यांनी सर्व गुंते सोडवून स्वतःला मोकळे ठेवले.
- ‘ईडी’ वगैरेंची चौकशी चालू असलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही, असे सांगून त्यांनी भुजबळांसारख्यांचा भाजप प्रवेशाचा दरवाजा दाणकन बंद केला. राजकारणात नीतिमत्ता शिल्लक आहे. मुख्यमंत्र्यांची त्यासाठी धडपड सुरू आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours