मुंबई, 7 सप्टेंबर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे सचिन खरात यांनी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे.
आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक वरळीतून निवडणूक लढत असल्याचे समजताच सचिन खरात यांनी जयंत पाटील यांना पत्र लिहून निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या विरोधपक्षांना घेऊन आघाडी करत असेल तर त्या आघाडीचा उमेदवार आदित्य ठाकरे विरुद्ध लढणार असे समजावे, असा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीवरून युतीमध्ये तूतू-मैमै!
शिवसेना आणि भाजपात आता आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीवरून तूतू-मैमै सुरू झाली आहे. अनिल परब यांनी वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे संभाव्य मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, अशी घोषणा करताच तिकडे फडणवीस यांना खळबळून जाग आली. अनिल परब हे सेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? असा सवालच त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे...
दुसरीकडे, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या होत्या. राऊत यांना आदित्य यांना गळाभेटीचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला होता. 'महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे.' असे फोटोच्या खाली कॅप्शन दिले होते. राऊत यांनी या पोस्टच्या माध्यमातून आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते.
दरम्यान, शिवसेनेच्या 53 वर्षांच्या इतिहासात ठाकरे घराण्यातील एकही सदस्याने निवडणूक लढलेली नाही. आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील की नाही, याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा असेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले होते. महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. आदित्य ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणूक लढू शकतात, असे संकेत राऊत यांनी दिले आहेत. राऊत यांनी सांगितले की, 28 वर्षीय आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत सक्रीय सहभाग घेतला आहे. आजोबा अर्थात बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेल्या शिवसेनेला आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी आदित्य परिश्रम घेत आहेत.
ठाकरे घराण्यातील सदस्य कायम प्रमुख असतो..
भाजप-शिवसेनेची सत्ता राज्यात कायम ठेवण्याच्या दिशेने आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री बनविण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, ठाकरे उपपद घेत नाहीत. ठाकरे घराण्यातील सदस्य कायम प्रमुख असतो. ठाकरे घराण्याची राज्य तसेच देशाच्या राजकारणात एक प्रतिष्ठा आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours