मुंबई, 14 ऑक्टोबर : राज्याचे अर्थमंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांवर सडकून टीका केली आहे. न्यूज 18 लोकमतने घेतलेल्या मुलाखतीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींचा खुलासा केला तर यावेळी बोलताना त्यांनी सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा सांगत शिवसेनेच्या 10 रुपयांत जेवण देण्याच्या योजनेवरही टीका केली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे, शरद पवार आणि अजित ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारला असता 'एक वक्ता म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज ठाकरे यांचा वापर करून घेतला आणि मग मतलब निकल गया तो हम जानते नही. राज ठाकरे यांना ना पक्ष ओळखता येतो ना माणसं ओळखता येतात. मी राज ठाकरे यांना काही सल्ला देणार नाही. मी फक्त इतकं म्हणेन की फुल देवाच्या मस्तकावर जास्त शोभून दिसतं पण या फुलानं चूक केली' अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
'पुन्हा एकदा पक्षाला उभं करण्याचा पवारांचा प्रयत्न'
यावेळी मुलाखतीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांच्यावरही कठोर शब्दात टीका केली आहे. 'हातवारे करून जर मतदान झालं असते तर हातवारे करणारे समाजात अनेक आहेत. पराभव झाल्यानंतर माणूस खचतो; पवार साहेबांचं आत्ताचं ते रुप आहे. त्यांना पराभव पचवता येत नाही. पवारांनी वयाच्या 27 वर्षीपासून सत्ता पाहिली आहे. आयुष्याभर लाल दिव्याची गाडी बघितली आहे. आणि आज आपल्या जवळची लाल रक्ताची माणसं भाजपमध्ये जाताना पाहताना त्यांचे डोळे लालबुंद होणं स्वाभाविक आहे. त्यांना दुर-दुरपर्यंत त्यांच्या पक्षासाठी अंधार दिसत आहे. आता पक्षातली वादावादी पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवायचं की वादावादी हा प्रश्न त्यांच्याही समोर असेल. इतके वर्ष सत्ताधारी म्हणून असणारं वलय आहे. ते वलय नष्ट होताना जेव्हा पवार साहेब बघत असतील. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाला उभं करण्याचा असफल प्रयत्न करत आहेत'
तर सत्ता येणार नाही असा अंदाज आला की माणूस भावुक होतो. सत्ता त्यांच्यासाठी प्राण होता आणि अशा प्रकारे सत्ता जाताना दिसताना भावुक होणं स्वाभाविक आहे अशी टीका मुनगंटीवार यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्यावर केली आहे. दरम्यान, मुनगंटीवार यांनी केलेल्या या जहरी टीकेवर विरोधक आता काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours