पंढरपूर,7 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक मतदारसंघात झालेल्या बंडखोरीवर वेळीच इलाज करता न आल्याने राष्ट्रवादीविरूद्ध घड्याळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर राष्ट्रवादीला मतदान करू नका, असं सांगण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आली आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांचा प्रचार सभेसाठी सोमवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार वेळापूर येथे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने संजय पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली. मात्र, त्यांना मतदान करू नका. त्यांच्या अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना मतदान करा, असे खुद्द अजित पवार यांनी सांगितले आहे. अशीच परिस्थिती सांगोल्यात झाली आहे. आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शेकापला सोडली. त्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे इथेही राष्ट्रवादीऐवजी शेकापला मतदान करा, असे सांगण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आली आहे. उमेदवारी अर्ज भरताना आणि तो मागे घेण्यापर्यंत राष्ट्रवादीमध्ये ताळमेळ नसल्याने आता राष्ट्रवादी नेतृत्वावरच राष्ट्रवादीला मतदान करू नका, असे सांगण्याची वेळ आली आहे.
आघाडीत बिघाडी..
पंढरपूरच्या जागेवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. कॉंग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने चिडून कॉंग्रेस नेत्यांनीही पंढरपूरमध्ये कॉंग्रेस उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येथील जागेरून निवडणूक प्रचारापूर्वीच दोन्ही कॉंग्रेसमध्ये घमासान सुरू झाले आहे.
पंढरपुरात आघाडीतील बिघाडी महायुतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंढरपूर विधानसभा मतदार संघात यावर्षी कमालीची चुरस निर्माण झाली आहे. माजी आमदार सुधाकर परिचारकांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीला रंगत आली आहे. महायुतीने राजकारणातील मुरब्बी सुधाकर परिचारकांना उमेदवारी देत विरोधी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. परिचारकांच्या विरोधात कॉंग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या आमदार भारत भालकेंना उमेदवारी दिली आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours