मुंबई, 13 एप्रिल : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेली धारावी आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. धारावीमध्ये गेल्या 12 तासात 4 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे धारावीतील रुग्ण संख्या आता 47 वर पोहोचली आहे. त्यातील एका 60 वर्षीय रुग्णाचा सायन रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर धारावीमध्ये मृतकांची संख्या 10 वर पोहोचली आहे. रुग्णांच्या या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

धारावीमध्ये सगळ्यात जास्त पॉझिटीव्ह मुकुंद नगरमध्ये 9 तर सोशल नगरमध्ये 6 त्याखालोखाल मुस्लिम नगर, जनता सोसायटी प्रत्येकी 5 असे रुग्ण आढळले आहेत. तर या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर धारावीत पोलिस स्टेशनबाहेर निर्जंतुकीकरणासाठी पहिला 'सॅनिटायझेशन टेंट' उभारण्यात आला आहे. स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या या सॅनिटायझेशन टेंटमुळे धारावीतील पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच यावेळी पोलिसांना विशेष हेल्मेट मास्कचे वाटपही करण्यात आले. अशाच रीतीने परिसरातील रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी 'सॅनिटायझेशन टेंट' उभारण्यात येणार असल्याची माहिती खासदार शेवाळे यांनी दिली आहे.

धारावीत कोरोनाने कहर केला आहे. एकूण रुग्ण संख्या 47 वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सध्या धारावी परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरातील लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. सतत गस्त घालणारी पोलिस पथके दिवसभरात अनेकांच्या संपर्कात येत असतात. अशा परिस्थितीत पोलिसांनी स्वतःची काळजी घेणे, अत्यंत गरजेचे आहे. गस्त घालून आलेले पोलिस स्थानकात जाण्यापूर्वी या सॅनिटायझेन टेंटमध्ये जातील. यातून होणाऱ्या फॉगिंगच्या साहाय्याने पोलिस स्वतःला सॅनिटाइज करू शकतील.

अहोरात्र मेहनत घेणाऱ्या पोलिसांना प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी धारावी पोलिस स्थानकात सॅनिटायझेशन टेंट उभारण्यात आला आहे. या टेंटची उपयोगिता तपासून येत्या काही दिवसांत धारावीतील रुग्णालये आणि महत्त्वाच्या ठिकाणी असेच टेंट उभारण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours