रीपोटर... संदीप क्षिरसागर 
जिल्हयातील सुरक्षा यंत्रणेत वाढ  
 सर्व परवानग्या बंद
 औषधांचा मुबलक साठा ठेवा
 नमाज पठण घरातच करावे
 अफवा पसरवू नका
भंडारा,दि. 28 : जिल्हयात एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. अशा परिस्थिती कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जनजीवन विस्कळीत होणार नाही याची काळजी घेवून जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यात आली आहे. आडमार्गाने जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम. जे प्रदीपचंद्रन यांनी दिले. तहसिलदार व मुख्याधिकारी यांनी सर्व परवानग्या बंद कराव्या, असे त्यांनी सांगितले.
  कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसंबंधी जिल्हयातील पोलीस अधिकारी, तहसिलदार,  खंडविकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची  बैठक जिल्हा परिषद सभागृहात आयोजित  करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ,    अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद मोटघरे, यावेळी उपस्थित होते.
  कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनेअंतर्गत खाजगी डॉक्टर्स असोसिएशनची बैठक घेऊन चर्चा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. आरोग्य यंत्रणेने पीपीई, मास्क, सॅनिटायझरचा मुबलक पुरवठा ठेवावा. कोविड सेंटरमध्ये सर्व स्टाफची उपस्थिती आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गावर जीवनावश्यक वस्तुंची मालवाहतूक करतांना दुकानदार खाजगी वाहनातून मालवाहतूक करतांना आढळले आहेत. आता मालवाहतूक करतांना  दुकानदारांनी परवानाधारक माल वाहतूक वाहनामधूनच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. वयोवृध्द व दिव्यांगाना सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात. किराणा असोशिएशनची बैठक घेवून त्याबाबत माहिती देण्यात यावी. तसेच औषध विक्रेत्यांची तहसिलदारांनी बैठक घेऊन औषधांचा तुटवडा भासणार नाही याबाबत त्यांना अवगत करावे, असे ते म्हणाले. मुस्लीम धर्मियांच्या रमजान सणाबाबत योग्य नियोजन करावे, नमाज पठण घरातच करण्यात यावे. रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई असल्याचे, त्यांनी सांगितले. 
शासकीय अधिकारी व बँक कर्मचाऱ्यांचे अपडाऊन बंद करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत शिवभोजनाचा आढावा  घेतला.
  जिल्हयातील 9 चेक पोस्टसहित सर्व नाक्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून या व्यतिरिक्त आडमार्गाने येणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करुन कलम 144 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितले. वारंवार सुचना करुनही  रेड झोन तसेच इतर जिल्हयातील व्यक्ती  नियमांचे उल्लंघन करुन जिल्ह्यात प्रवेश करतात असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोना  प्रादुर्भावाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक कारवाईस सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले. सर्वांनी सतर्क रहावे असेही ते म्हणाले. नागरिकांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर कोरोना बाबत अफवा तसेच फेक न्यूज पसरविणे दंडनीय अपराध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
 आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी कोविड-19 च्या नियोजनाची सादरीकरणाद्वारे  माहिती दिली. यामध्ये सुरक्षा, परिवहन, आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या, उपविभागीय अधिकारी यांचे कार्य, सहनियंत्रण, तहसिलदारांनी कर्मचाऱ्यांना दयावयाचे प्रशिक्षण, सर्व विभागांनी आपसात ठेवावयाचे समन्यव याबाबत माहितीचा समावेश आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours