 जिल्हाधिकारी एम.जे. प्रदिप चंद्रन

रीपोटर... संदीप क्षिरसागर 

 9 ते 14 एप्रिलपर्यंत कडक बंदोबस्त  ठेवा
 सर्वांसाठी मास्क अनिवार्य
 सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा
            भंडारा,दि. 7 :-  कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे निर्देश असून नागरिकांनी जीवनाश्यक कामासाठी बाहेर जातांना मास्क लावूनच बाहेर पडावे. दुचाकी वाहनावर फक्त एकच व्यक्ती असा नियम असतांना नागरिक नियमांचे  उल्लंघन करीत आहेत. 9 ते 14 या संचारबंदीच्या काळात बंदोबस्त कडक करण्यात येणार असून नियमांचा भंग करणाऱ्या दुचाकी वाहनधारकावर गुन्हे दाखल करा तसेच वाहन जप्त करा, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसंबंधी   जिल्हयातील  पोलीसअधिकारी,तहसिलदार, खंडविकस अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची  बैठक जिल्हा परिषद सभागृहात आयोजित  करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते  यावेळी उपस्थित होते.
कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करत असून मार्केटमध्ये बॅरिकेट लावलेल्या भागात कडक तपासणी  करण्यात यावी. नागरिकांना प्रवेशापूर्वी हाताला सॅनिटायझर व चेहऱ्यावर मास्क लावण्याची सक्ती करावी. नागरिकांनी लहान मुलांना मार्केटमध्ये आणू नये.  बाहेर येतांना सुध्दा सॅनिटायझर लावावे. मार्केटमध्ये पोलीस बंदोबस्त कडक करावा. तसेच होमगार्ड नेमावे. याबाबत ध्वनीक्षेपकावरुन सूचना दयाव्यात. जिल्हयात जलद सर्वेक्षण पथक नियमित नोंदणी करीत असून नागपूर मार्गे येणाऱ्या प्रवाश्यांपासून कोरोनाचा धोका अधिक आहे,  त्यामुळे जिल्हा सिमेवर बंदोबस्त कडक ठेवावा. संशयित आढळल्यास त्यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी घराबाहेर पडतांना ओळखपत्र सोबत ठेवावे.  प्रशासनास सर्वेक्षणाच्या कामात सहकार्य न करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांचेवर कारवाई करण्याचा ईशारा त्यांनी दिला.
   लोकप्रतिनिधीकडून अन्न धान्य व रेशन वाटप करतांना गर्दीचे प्रमाण वाढत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. अशा कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिगचे  उल्लंघन होत आहे. 144  कलम लागू असून  संचार बंदीचे  काटेकोर पालन व्हावे याची दक्षता घ्यावी. अन्न धान्य वाटप करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. जिल्हयात बसस्थानक परिसरात खाजगी वाहन आढळल्यास गुन्हे दाखल करुन वाहन जप्त करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक यांनी सांगितले.  
ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा गरजु व्यक्तींची यादी तहसिलदार तयार यांनी करावी. ही यादी शासनाकडे पाठवून अतिरिक्त धान्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच  सर्वांना अन्न धान्य, रेशन देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी सांगितले. नागरिकांना जीवनाश्यक  वस्तुंची कमी भासणार नाही  याची दक्षता घ्या. ग्रामीण भागात मास्क लावणे आवश्यक असल्याची जागृती करण्यात यावी. वयोवृध्द नागरिकांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. आशा वर्कर, आंगणवाडी  सेवीका तसेच सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दयावे. सर्दी, खोकला व श्वसनाचे आजार असलेल्या मुलांची यादी तयार करण्याची जबाबदारी खंड विकास अधिकारी यांचेकडे असणार आहे. नियोजित कालावधीत तपासणी पूर्ण करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

          देखरेखीखालील व्यक्तीने,  त्यांची सुश्रूषा करणाऱ्या व्यक्तीने, निकट सहवासितांनी घरातील सुश्रूषे दरम्यान वापरलेले मास्क 5 टक्के ब्लिच सोल्युशेन किंवा 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जंतुक करुन त्याची जाळून विल्हेवाट लावावी. वापरलेला मास्क हा जंतुसंसर्ग युक्त आहे असे समजावे त्याचा पुनर्वापर करू नये. खोकला, ताप, श्र्वसनाचा त्रास, धाप लागणे अशी लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी 07184-252247, 07184-252317, जिल्हा नियंत्रण कक्ष 07184-251222 किंवा पोलीस विभागाशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours