मुंबई : कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यात आघाडीवर असलेल्या पोलिसांचीच सुरक्षा वाऱ्यावर असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. याचसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वैद्यकीय सेवा देणाऱ्यांप्रमाणे पोलिसांनाही PPE किट द्या, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या पूर्ण पगारासह त्यांना धोकादायक परिस्थितीत जादा काम केल्याबद्दल वेगळा भत्ता जाहीर करा, अशीही मागणी या याचिकेत केली आहे.

राज्य सरकारने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील सरकारी अधिकाऱ्याच्या पगारात कपात करु नये जेणेकरुन त्यांचे मानसिक खच्चीकरण होईल, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. पुण्यातील एक वकील तौसिफ शेख आणि सामाजिक कार्यकर्ता सतीश गायकवाड यांनी अॅडव्हकेट गणेश गुप्ता यांच्यातर्फे ही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर केली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणं अपेक्षित आहे.

लॉकडाऊन लागल्यापासूनच दिवसरात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलीस दलाचे हाल अधिक बिकट झाले आहेत. कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव फैलावत असताना रस्त्यांवर नाकाबंदीच्या ठिकाणी तपासणी करणाऱ्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सील केलेल्या वस्त्यांच्या, सोसायटींच्या तसेच क्वॉरन्टाईन करण्यात आलेल्यांच्या हॉटेल आणि हॉस्पिटलच्या बाहेर ड्युटी करणाऱ्या तसेच व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेचं काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

मुंबई पोलीस दलात कोरोनाचा केव्हाच शिरकाव झालाआहे. कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 49 वर पोहोचली आहे. ज्यात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचाही समावेश आहे. ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांना मास्क, ग्लोव्ज, सॅनिटायझर पुरवण्यात आले आहेत. मात्र या गोष्टी पुरेश्या नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ड्युटीवर तैनात असणाऱ्या पोलिसांची कोरोना चाचणी सक्तीची करावी आणि ती ठराविक कालांतराने होत रहावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. कारण एक पोलीस कोरोना पॉझिटिव्ह निघाला की, त्याच्यासोबत 10-15 पोलिसांना घरी बसवावं लागतं. ज्यामुळे कामाचा ताण हा सहाजिकच इतर पोलिसांवर वाढतो.

त्यामुळे अश्या खडतर परिस्थितीत काम करणाऱ्या पोलिसांना त्यांचा पूर्ण पगार देऊन सोबत धोकादायक परिस्थितीत काम केल्याबद्दल स्वतंत्र भत्ताही द्यावा. तसंच वैद्यकीय सेवेतील लोकांप्रमाणेच पोलिसांनाही PPE किट देण्यात यावेत. जेणेकरुन कोरोनाशी मुकाबला करण्यात आघाडीवर असलेल्या पोलिसांना दिलासा मिळेल आणि त्यांचं मनोधैर्य वाढेल, अशी मागणी हायकोर्टाकडे या याचिकेतून करण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours