मुंबई : सध्या एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे अशा मंडळींची अस्वस्थ तगमग, तळमळ सुरूच आहे. त्या तगमगीतून एखाद्या नव्या भूकंपाची वात पेटू नये म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे, असा टोला सामनातून शिवसेनेनं भाजपला लगावला आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्वत:च्या पायावर मजबुतीने आत्मनिर्भर झाले आहे. त्याच आत्मनिर्भरतेचा मार्ग विरोधी पक्षाने स्वीकारला तर राज्यातील कोरोनाविरोधी लढाईस बळ मिळेल, असं देखील सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

कोरोनाच्या संकटानंतर राज्यात आणि देशात काँग्रेसमध्ये मोठे राजकीय भूकंप होतील असं भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एबीपी माझाच्या मुलाखतीत म्हटले होते. यावरून आता शिवसेनेनं त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारणात अनेकदा पेच निर्माण होतात. मात्र सध्या कोरोनाचा विषाणू जग पोखरत आहे. अशावेळी राजकारणाचा विषाणू विरोधकांच्या डोक्यात वळवळावा हे बरं नाही, शेवटी मोदी-शाह यांनाच लस टोचून विषाणूचा बंदोबस्त करावा लागला, अशा शब्दात सामनातून भाजपवर हल्लाबोल केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours