पुणे: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन आता संपत आले आहे. त्यामुळे राज्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांना परत त्यांच्या राज्यात पाठवण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांनी त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबत सरकारने कार्यपद्धती निश्चित केली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. मात्र, नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मोठा खुलासा केला आहे.
पुण्यात अडकलेल्यांनी आहे त्याच ठिकाणी रहावे. कुठल्याही अफवांना बळी पडू नका. जिल्हा प्रशासनाच्या पत्रानंतरच स्थलांतरणास परवानगी मिळणार असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना सांगितलं आहे. तथापी स्थलांतरणासाठी इच्छूकांनी जाण्यासाठी घाई करु नये, तसेच घाबरुन जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की, सद्यस्थितीत कुठल्याही बस अथवा रेल्वे सुरु करण्यात येणार नाहीत. त्यामुळे कामगार व नागरिकांनी कुठल्याही अफवेला बळी पडू नये. तसेच घराबाहेर न पडता आहे. त्या ठिकाणीच सुरक्षित राहावे. जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांची व व्यक्तींची प्रशासनाच्या वतीने माहिती घेऊन स्थलांतरणासाठी इच्छुकांची यादी तयार करण्यात येणार आहे. हे कामगार ज्या राज्यात जाण्यासाठी इच्छूक आहेत. त्या राज्य शासनामार्फत संपर्क साधून त्यांना संबंधित राज्याची परवानगी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरु होणार आहे.
येथे करता येईल तक्रार...
जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचे पत्र असेल तरच अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार आहे. यानंतर या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल. त्यानंतरच स्थलांतरनाची कार्यवाही सुरु केली जाईल. कामगारांच्या सर्व तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 24 तास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तक्रार असल्यास दुरध्वनी क्र.020-26111061 अथवा 020-26123371 अथवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा तसेच dcegspune1@gmail.com व controlroompune@gmail.com या इमेलवर तक्रारी स्विकारल्या जातील. याशिवाय तालुका नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. राम यांनी दिली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours