रिपोर्ट... राजकुमार दहेकर
भंडारा : बऱ्याच दिवसापासून लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा होणार असल्याच्या शंकाकुशकांना आज पुर्णविराम मिळाला. गुरूवारी निर्वाचन आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रासाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून याच बरोबर आदर्श आचारसंहिता ही लागू झाली आहे. पोटनिवडणूक २८ मे रोजी होत असून मतमोजणी ३१ मे रोजी होणार आहे.
नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक होणार किंवा नाही यासंदर्भात विविध चर्चांना ऊत आले होते. यादरम्यान उच्च न्यायालयात याबाबत याचीका रद्दबातल केल्यानंतर निवडणूक तारखांची घोषणा होईल, असे वाटत होते. गुरुवारी या चर्चेला पुर्णविराम मिळाला.

यासंदर्भात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी गुरूवारी सायंकाळी पत्रपरिषद घेऊन पोटनिवडणुकीची प्राथमिक माहिती दिली. यात ३ मे रोजी अधिसूचना जाहिर करण्यात येत असून याच तारखेपासून नामनिर्देशन अर्ज भरण्याला प्रारंभ होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत १० मे असून ११ तारखेला नामनिर्देशन अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. १४ मेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. २८ मे रोजी मतदान तर, ३१ मे रोजी मतमोजणी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात प्रथमच लोकसभा निवडणूकीला मतदानात ‘व्हिव्हीपीएटी’चा वापर ईव्हीएम करण्यात येणार आहे. यात मतदाराला मतदान केल्यानंतर या मशिनीवर आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केले आहे, याची खात्री करुन घेता येणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी १ जानेवारी २०१८ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. आदर्श आचार संहिता लागू झाली असून याचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याच सोबत आचार संहितेअंतर्गत सर्वच शासकीय वाहने जमा करण्यात येणार आहेत. राजकीय पक्षांची सभा तसेच सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांसाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. याशिवाय आंदोलन करण्यासाठीही परवानगी घ्यावी लागणार आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची सर्व वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात येणार आहेत. आदर्श आचारसंहितेअंतर्गत भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी याचे पालन करण्यासंदर्भात प्रशासनाला सहकार्य करावे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भांत शुक्रवारी भंडारा व गोंदिया जिल्हाधिकाºयांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असून निवडणूकीबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.

याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, निवासी उपल्हिाधिकारी विजय भाकरे, अप्पर उपजिल्हाधिकारी दिलीप तलमले आदी अधिकारी उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours