28 एप्रिल : डोंबिवली पश्चिममधील उमेशनगर परिसरात एका तरूणाने अंमली पदार्थाच्या नशेत रस्त्यावर समोरून आलेली एटीएम व्हॅन दगडफेक करून फोडली. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं खळबळ माजलीय.
एक तरूण अरूंद रस्त्यानं कारसह जात होता. चिंचोळ्या रस्त्यावर एक एटीएम कॅश व्हॅन समोरून आली. त्यामुळे त्याला पुढे जाता येत नव्हतं. वैतागलेला हा तरूण कारमधून खाली उतरला.
अंमली पदार्थाच्या नशेत धुंद असलेल्या या तरूणाने लाखोली वाहत व्हॅनमधील कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या आणि शिवीगाळ केली. कर्मचारी खाली उतरत नसल्याचे पाहून या बेधुंद तरूणानं रस्त्यावर पडलेल्या दगडांचा या व्हॅनवर मारा सुरू केला.
या दगडफेकीत व्हॅनच्या पुढच्या काचा फुटल्या. हा प्रकार सुरू असताना रस्त्यावर जमा झालेल्या बघ्यांनी या तरूणाला कोणताही प्रतिबंध केला नाही. त्यानंतर हा तरूण कारमध्ये बसून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी पकडून त्याला पोलिस ठाण्यात नेले. तिथं पोलिसांनी व्हॅन कर्मचाऱ्यांची जबाब नोंदविला. मात्र या तरूणाने नुकसान भरपाई दिल्यामुळं या वादावर पडदा पडला. तर पोलिसांनी समज देऊन त्या तरुणाला सोडलं.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours