मुंबई, 3 मे : कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही त्यामुळे  भीमा कोरेगाव प्रकरणी जर संभाजी भिडे जबाबदार असतील तर त्यांना मिलिंद एकबोटे प्रमाणे अटक झाली पाहिजे.त्यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. चौकशीसाठी संभाजी भिडेंना पोलिसांनी त्वरित ताब्यात  घेतले पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली.
आज बांद्रा येथील उपनगर मुंबई जिल्हा अधिकारी कार्यालयावर  रिपाइंच्या वतीने मागासवर्गीयांच्या विविध मागण्यांसाठी प्रचंड मोर्चा काढण्यात आला. म्हाडा कार्यालय ते जिल्हा अधिकारी कार्यालय असा मोर्चा  रामदास आठवलेंच्या नेतृत्वात काढल्यानंतर त्यांच्या संविधान बंगल्यासमोर मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले.
अनेकांच्या नाकाला झोबल्या मिरच्या; कारण मी काढला  आहे मोर्चा ; त्यांना काढुद्या कोणताही परचा मात्र मी काढणार बहुजनांच्या प्रश्नावर वेळोवेळी  मोर्चा असे सांगत मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांवर आपण मंत्री असलो तरी मोर्चे काढणार असं रामदास आठवलेंनी जाहीर केलं. राज्यात  मंत्री असताना नामांतराच्या प्रश्नावर आपण मोर्चे काढले आहेत.आताही केंद्रात मंत्री असलो तरी मोर्चे काढणार. हा मोर्चा सरकार विरुद्ध नसून सरकारला बळकटी देण्यासाठी आहे. संविधान कोणी बदलू शकत नाही आणि आरक्षण कोणी घालवू शकत नाही जे असं करण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही घालवू, देशाचे संविधान अत्यंत उंचीवर आहे त्याला हात लावायला गेलेल्यांच्या मुडदे पडलेले आहेत असं सांगत भारतीय संविधान कधीही बदलले जाणार नाही मात्र याबाबत खोटा प्रचार करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांविरुद्ध हा मोर्चा आहे असं रामदास आठवले म्हणाले.
अॅट्रॉसिटी ऍक्टच्या संरक्षणासाठी आपण खंबीरपणे सरकारमध्ये आहोत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी सरकार सहमत नाही. सरकार अॅट्रॉसिटी  कायद्याच्या बाजूने आहे.त्यासाठी आरपीआय नेही पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. अॅट्रॉसिटी कायदा आणि आरक्षणाला आपण  धक्का लागू देणार नाही असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours