रिपोर्टर--जाफरी क्राईम महाराष्ट्रा
मुंबई: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयातील सील तोडून काही फाईल्स लंपास करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  महामंडळानं तशी तक्रारही पोलीस ठाण्यात नोंदविली असून या सर्व फाईल्स महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

दहिसर येथे अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचं कार्यालय आहे. याच कार्यालयात महामंडळातील सर्व फाईल्स आणि रेकॉर्डस ठेवण्यात आलं होतं. महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि आमदार रमेश कदम यांनी केलेल्या घोटाळ्याच्या फाईल्सही याच कार्यालयात ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आज सकाळी कार्यालयाचं सील तोडण्यात आल्याचं दिसून आलं आणि फाईल्सही गायब झाल्याचं आढळल्यानं एकच खळबळ माजली आहे. या फाईल्स गायब करण्यामागे कदम यांच्या भावाचा हात असल्याची चर्चा आहे. मात्र गायब झालेल्या फाईल्स या घोटाळ्याच्याच आहेत की नाही याबाबतच्या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही. याप्रकरणी दहिसर पोलीस अधिक तपास करत आहेत. 

या घोटाळ्याप्रकरणी रमेश कदम सध्या आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत आहे. कोणतीही प्रक्रिया न राबवता महामंडळात ७३ जणांची भरती करणे, नियुक्त झालेल्यांना २० लाखाचं कर्ज देऊन १५ लाखांची लाच घेणे, कर्ज प्रकरणांवर खोट्या सह्या करणे, महालक्ष्मी दुध संस्था आणि बारामती दुध संघाला कागदोपत्री ५ कोटी रुपये देणे आणि विधानसभा निवडणुकीत साडे सहा कोटी रुपये वाटप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

महाव्यवस्थापक निलंबित 

दरम्यान, महामंडळाच्या कार्यालयातून फाईल चोरी प्रकरणी महामंडळाचे महाव्यवस्थापक दत्तात्र झोंबाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच महामंडळाच्या घोटाळ्याशी संबंधित सर्व फाईल्स सुरक्षित असल्याचं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी स्पष्ट केलं. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours