रिपोर्टर-- परदेशी
देशभरातील बँकांमध्ये गेल्या पाच वर्षांत २३ हजार बँक घोटाळे झाले असून त्यातून लोकांच्या कष्टाच्या १ लाख कोटींची लूट झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे बँकांची बुडित कर्जे वाढण्यात आणि बँका बुडण्यात अशा घोटाळय़ांचा मोठा हात आहे. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेत केलेला १३ हजार कोटींहून जास्तीचा घोटाळा हा सर्वात मोठा बँक घोटाळा ठरला आहे.
देशात नोंदवण्यात आलेल्या घोटाळय़ांची रिझर्व्ह बँकेने दखल घेतली असून त्याची पडताळणी करून कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती ‘आरबीआय’ने दिली. बँक घोटाळय़ांमध्ये हजारो कोटी रुपये गुंतलेले असल्यामुळे त्याचा तपास सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी)मार्फत सुरू आहे. माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या मागणीत २०१३ ते २०१८ या पाच वर्षांतील बँक घोटाळय़ांची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय)दिली आहे.
एनपीएस’ची (बुडित कर्जे) दलदल
देशभरात उद्योगधंद्यांसाठी घेतलेली बुडित कर्जे डिसेंबर २०१७ पर्यंत ८ लाख ४० हजार ९५८ कोटी रुपयांची होती. यात सेवा आणि कृषी क्षेत्राचाही समावेश आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे बुडित कर्ज सगळय़ात जास्त आहे. ते २ लाख १ हजार ५६० कोटी इतके आहे. त्यानंतर पीएनबी बँकेचे ५५ हजार २०० कोटी, आयडीबीआयचे ४४ हजार ५४२ कोटी, बँक ऑफ इंडिया ४३ हजार ४७४ कोटी, बँक ऑफ बडोदा ४१ हजार ६४९ कोटी, युनियन बँक ऑफ इंडिया ३८ हजार ४७ कोटी, कॅनरा बँक ३७ हजार ७९४ कोटी, आयसीआयसीआय बँक ३३ हजार ८४९ कोटी.
मोदी, चोक्सी, बँक अधिकाऱयांवर लवकरच आरोपपत्र
देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठा पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपींविरुद्ध लवकरच सीबीआयकडून आरोपपत्र दाखल होणार आहे. मुख्य सूत्रधार नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीसह ‘पीएनबी’तील अधिकाऱयांवर आरोपपत्र दाखल होईल.
– एप्रिल २०१७ ते १ मार्च २०१८पर्यंत ५ हजार १५२ घोटाळय़ांची नोंद झाली असून त्यात बँकांना २८ हजार ४५९ कोटींना चुना.
– २०१६ ते २०१७ मध्ये ५ हजार ७६ घोटाळे झाले आणि त्यात बँकांची २३ हजार ९३३ कोटी रुपयांची फसवणूक.
– २०१५-२०१६ मध्ये ४ हजार ६९३ घोटाळय़ांमध्ये १८ हजार ६९८ कोटी रुपये तर २०१४-२०१५मध्ये ४ हजार ६३९ घोटाळय़ांमध्ये १९ हजार ४५५ कोटी रुपयांचा चुना.
– २०१३ ते २०१४ मध्ये ४ हजार ३०६ घोटाळे झाले ज्यात लोकांचे १० हजार १७० कोटी रुपये लुटण्यात आले.
– सीबीआयने नुकतेच आयडीबीआय बँकेचे माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि एअरसेलचे प्रवर्तक सी. शिवशंकर, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या कंपन्यांविरोधात ६०० कोटींच्या घोटाळय़ांप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
– आयडीबीआयच्या १५ मोठा अधिकाऱयांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने केलेल्या तक्रारीनंतर आयडीबीआयच्या या अधिकाऱयांविरोधात २०१० ते २०१४ कालावधीत कर्जे वाटून घोटाळे केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
– सीबीआयने आयडीबीआयमधील याच घोटाळय़ाप्रकरणी इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर खरात, सिंडिकेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक मेलीन रेगो आणि आयडीबीआयचे अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक एम. एस. राघवन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours