मुंबई, 21 जून : आज चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या दिनानिमित्त देशभरात योग उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यासाठी उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधून उपस्थित राहणार आहेत.

राजस्थान कोटा येथे बाबा रामदेव यांनीही योगा दिन साजरा केला आहे. यात वसुंधरा राजे सिंधिया यांचीही उपस्थिती आहे.
यासोबतच भारतीय दूतवासांच्या समन्वयातून योग दिनानिमित्त 150 देशांमध्ये हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. आजच्या या योगदिनानिमित्त देशाभरातील विविध राज्यांसह जिल्हापातळीवरही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.
नवी दिल्लीत राजपथावर योनदिनानिमित्त प्रमुख कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जवळपास 20 हजार लोक राजपथावर योग दिन साजरा करणार आहेत. यावेळी दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल आणि केंद्रीय कृषी मंत्री उपस्थित असतील.
मुंबईमध्ये योग दिनानिमित्त आशिष शेलार यांनी योग शिबिर आयोजित केलं आहे. या शिबिरात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, बाबूल सुप्रियो, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि मुंबई मनपा आयुक्त अजोय मेहता सहभागी होणार आहेत.
केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर चार वर्षांपासून आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जूनला साजरा केला जातो. यावर्षी या योगदिनाला नागपुरात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे ठरविले आहे.
नागपूर महापालिकेसह जवळपास 16 संघटनांच्या मदतीने शहरात ठिकठिकाणी योग दिन साजरा केला जाणार आहे. शहरातील योगदिनानिमित्ताने मुख्य कार्यक्रम धंतोलीतील यशवंत स्टेडीयममध्ये होणार आहे.
आज साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी महापालिकेनेही केलीय. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये योग व्यायाम प्रकारातील प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे, तर 44 ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत योगासने केली जाणार आहेत.
या वर्षी महापालिका शाळांमधील सुमारे सव्वा लाख विद्यार्थी आणि 15 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एकत्रितपणे सलग 45 मिनिटे योग व्यायाम प्रकारातील विविध आसनांची प्रात्यक्षिके करून, आंतराराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहेत, अशी माहिती शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी दिली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours