मुंबई, 09 जून : मुंबईत काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर सकाळपासून पावसाचा जोरा ओसरलेला पहायला मिळाला. तर काही वेळा आधी पावसाने पुन्हा जोर धरला आहे. दक्षिण मुंबईत तुलनेनं पावसाचा जोर जास्त आहे. तर उपनगरांमध्ये पाऊस ओसरलाय. पण पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 35 ते 40 मिनिटं उशिरानं सुरू आहे.
कल्याण ते बदलापूरमधल्या प्रवाशांचे अधिक हाल होतायेत, कारण काही लोकल रद्दही होतायेत. आणि रेल्वेकडून स्थानकांवर कोणत्याही प्रकारची उद्घोषणा केली जात नाहीये, त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
घाटकोपर भागात तर 100 मिलिमीटर पाऊस झाला. पण आता मुंबईतलं वातावरण सुखावह आहे. रस्ते वाहतूकही सुरळीत आहे. एकूणच वीकेंड असल्यामुळे बहुतांश मुंबईकर एंजॉय करायच्या मूडमध्ये दिसतायेत.
पण असं असलं तरी पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा. समुद्राच्या ठिकाणी फिरायला जाण्याच्या तयारीत असाल तर पाण्यात उतरण्याचे धाडस दाखवू नका.
मुंबईत पहाटे 2 ते 3 मधली पावसाची आकडेवारी
- घाटकोपर - 100 मिमी
- भांडुप - 67 मिमी
- मुलुंड - 60 मिमी
- कुर्ला - 38 मिमी
- चेंबूर - 34 मिमी
- बीकेसी - 25 मिमी
- मरोळ - 17 मिमी
- भायखळा - 10 मिमी
ठाण्यातही 24 तासांतली पावसाची आकडेवारी
- पाऊस - 120 मिमी
- एकूण तक्रारी - 83
- आगीच्या घटना - 2
- झाडं पडल्याच्या घटना - 42
- 18 ठिकाणी पाणी साचलं
- एका जागी भिंत कोसळली
तर दुससरीकडे, मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने मनमाडसह येवला तालुक्यातील अनेक गावांना झोडपून काढलं आहे. जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पाणी आले तर शेतदेखील पाण्यात वाहतायत. वादळी वाऱ्यामुळे शेड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात कांदा भिजून खराब झाला.
काही घरांची छप्परं उडाली तर डाळिंब बागादेखील जमीनदोस्त झाल्यात. पावसाचा सर्वात जास्त फटका हा तालुक्यातील पिंपरी, ठाणगाव, पाटोदा या गावांना बसला असून येथे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा मात्र पल्लवित झाल्या असून बळीराजा आता पेरणीच्या तयारीला लागला आहे.
मालवणात आज सकाळीच जोराच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. मालवणच्या आडारी देउळवाडा आडवन या सखल भागात अनेक ठिकाणी पाणी भरलं. तर मालवण एसटी स्थानकाच्या आवारातलं गुलमोहराचं झाडंही या वादळी पावसात जमीन दोस्त झालय. दांडी भागातल्या मच्छीमाराना आपल्या होड्या वाहून जाउ नयेत म्हणून बांधून ठेवाव्या लागल्या . समुद्राला आलेल्या उधाणामुळे मालवणच्या किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूपही झालीय .
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours