मुंबई: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने शुक्रवारी पुन्हा एकदा मधूनच जोरदार कोसळत मुंबईकरांना आपले अस्तित्व दाखवून दिले. शनिवारीही तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, आज प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
सध्याच्या परिस्थितीनुसार सोमवारीही मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 62 बंधारे पाण्याखाली गेल्याने 80हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून आज सकाळी पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फुटांवर होती. पावसाचा जोर कायम राहिला तर पंचगंगेत धोक्याची पातळी याची शक्यता आहे.
जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत असून चंदगड आणि गगनबावडा या दोन्ही तालुक्यांमध्ये गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी झालीये. तर या पावसामुळे जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यूही झालाय.
पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 7 दिवसांपासून दमदार पाऊस
पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 7 दिवसांपासून दमदार पाऊस पडतोय. त्यामुळे सूर्या नदीवरील धामणी धरण 77 टक्के भरलं आहे. धामणी धरणाचं 5 दरवाजे उघडण्यात आलेत. या पैकी तीन दरवाजे दीड फुटांनी तर दोन दरवाजे एक फुटाने उघडण्यात आलेत. त्यामुळे धरणातून 5 हजार 600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सूर्या नदीला पूर परिस्थिती निर्माण झालीये. धामणी धरणातून वसई विरार महानगरपालिका, पालघर, बोईसर इत्यादी ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो.
दक्षिण गुजरातच्या नवसारीमध्ये पावसाचा हाहाकार
दक्षिण गुजरातच्या नवसारीमध्ये पावसानं हाहाकार माजवलाय. आतापर्यंत 800 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. सुरत, नवसारी आणि वलसाडमध्ये 4 दिवसांपासून पाऊस अक्षरशः कोसळतोय. नवसारीमध्ये तर मंगळवारपासून 324 मिलिमीटर पाऊस पडलाय. शहराचे अनेक भाग जलमय झालेत. खबरदारीचा उपाय म्हणून NDRFची एक तुकडीही मागवून घेण्यात आलीये. या भागात पावसामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय, तर जूनपासून 19 नागरिक मृत्युमुखी पडलेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours