देहू,ता.5 जुलै: संत तुकाराम महाराजांच्या रथाचं काम पूर्ण झालंय. जवळपास 500 किलो चांदीचा वापर करून हा रथ तयार करण्यात आलाय. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीनं या रथाला सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणाही बसवण्यात आलीय. दरवर्षी वारीच्या आधी या रथाची डागडुज्जी करण्यात येते आणि रथाला पॉलिश करण्यात येते. रथाचा प्रवास हा महिनाभराचा असल्यामुळं खास काळजी घेण्यात येते. त्याचबरोबर प्रचंड गर्दीच रथाला वाट काढावी लागत असल्यामुळं काम दणकट कसं होईल याचीही काळजी घेतली जाते.
दरवर्षी मानाच्या बैलाच्या दोन जोड्या रथाला जुंपण्यात येतात. यासाठी बैलाची खास निवड करण्यात येते आणि महिनाभर आधीपासून त्याची काळजीही घेण्यात येते. रथाला आपली जोडी लागावी यासाठी अनेक शेतकरी प्रयत्नशील असतात.
गुरूवारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान असून माऊली शनिवारी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहेत. लाखो वारकरी देहूनगरीत दाखल झाले आहेत. सकाळपासूनच देहू मंदिरात वारकरी दाखल होतील. विशेष पूजा, किर्तन आणि विठुनामाच्या गजराने तुकोबाराया दुपारनंतर विठुमाऊलींच्या भेटीसाठी निघतील. त्याआधी मंदिर परिसरात वारकऱ्यांचे खेळ रंगणार आहेत. अतिशय नयनरम्य असा हा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी वारकरी आतूर झाले आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours