रिपोर्टर... परदेशी
धुळे जिल्ह्यातील हत्याकांडातील आरोपींना फाशीची मागणी
माजी खासदार नाना पटोले, आमदार हरिभाऊ राठोड, मच्छींद्र भोसले करणार नेतृत्व

यवतमाळ : धुळे जिल्ह्यातील भटक्या विमुक्त समाजाच्या पाच लोकांना दगडाने ठेचून मारल्या प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी १० जुलै रोजी नागपुर अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. माजी खासदार नाना पटोले, आमदार, हरिभाऊ राठोड, मच्छींद्र भोसले हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.


या संदर्भात काल यवतमाळ येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार होते, यावेळी प्रा.माधव सरकुंडे, नारायण शिंदे, प्रल्हाद शिंदे, शिवाजी जगताप, ऍड. सोपानराव कांबळे,काशिनाथ शिंदे,रवी कोष्ठे, अरुण मांडवकर, सुरेश शिंदे, सुंदरलाल शिंदे यांची भाषणे झाली.
दरम्यान या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी 2 जुलै ला जिल्ह्यातील विमुक्त भटक्या जमातीच्या अनेक समाजबांधवांनी जिल्ह्याधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांची जिल्ह्याधिकारी कार्यालयात सभा सुरू होती. मोर्चेक-यांच्या विनंतीवरून पालकमंत्री मदन येरावार यांनी कार्यालयाबाहेर येऊन निवेदन स्विकारले.


पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणा-या या घटनेविरोधात समाजमन एकवटले असून १० जुलै रोजी होणा-या मोर्चाला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात राईनपाडा येथे मुलांचे अपहरण करणारी टोळी समजुन गावातील नराधमांनी पाच निष्पापांना क्रूरपणे ठार केले. मृतकांमध्ये दादाराव शंकर भोसले, भारत शंकर भोसले, राजू श्रीमंत भोसले, अगणू शंकर इंगोले, भारत शंकर माळवे यांचा समावेश आहे. या संतापजनक घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. या घटनेतील दोषींना शिक्षा मिळावी तसेच मृतकांच्या कुटूंबाला सरकारी नोकरी व २५ लाख रूपयांची मदत, भटक्या विमुक्तांसाठी तिसरी अनुसूची तयार करावी या मागण्यांसाठी येत्या १० जुलैला नागपुर अधिवेशनावर भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या आंदोलनाविषयी विमुक्त भटक्या जमातीचे नेते देवानंद पवार, प्रा.माधव सरकुंडे, नारायण शिंदे, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अ‍ॅड. सोपानराव कांबळे, साहेबराव पवार, शिवाजी जगताप, सुरेश शिंदे, 
सुंदरलाल शिंदे, रघुनाथ शिंदे, भगवान मांडवकर, मोहन जगताप, रवी कोष्ठे यांचेसह अनेक लोक उपस्थित होते.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours