पुणे : पुण्याजवळील चाकणमध्ये आज मराठा मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि राज्यात कुठे नाही तेवढा विध्वंस बघायला मिळाला. चाकणमध्ये आज  चाललेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केलेल्या तोडफोडी आणि जाळपोळीत खासगी आणि सरकारी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मात्र ज्यांनी ही तोडफोड केली ते स्थानिक आंदोलक नव्हतेच असा दावा केला जातोय. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनीही आपल्याला आयोजकांकडून तशीच माहिती दिली जात असल्याचा सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक आंदोलन करण्यात येत आहे. आज चाकणमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. तब्बल 100 ते 150 गाड्या आंदोलकांनी फोडल्या. चाकणजवळच्या तळेगाव चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलंय. संध्याकाळी चाकण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलीये.
दिवसभरात चाकमध्ये ज्यांनी ही तोडफोड केली ते स्थानिक आंदोलक नव्हतेच असा दावा केला जातोय. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांची न्यूज 18 लोकमतने प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनीही या आंदोलनात हिंसा करणारे हे बाहेरचे होते असं आयोजकांकडून माहिती मिळतंय असं सांगितलंय.

दुसरीकडे आज चाकणमध्ये रास्ता रोको आणि निषेध सभा होणार असल्याचं माहीत असून सुद्धा पोलिसांनी योग्य बंदोबस्त का लावला नाही आणि आंदोलन पेटल्यानंतर घटनास्थळी पोहचायला पोलिसांना 4 तास का लागले हे प्रश्न ही अनुत्तरीत आहेत. अद्यापही कुणालाही अटक केल्या गेली नाही.

आणखी एक आमदाराचा राजीनामा
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलीये. मराठा आरक्षण, धनगर समाजाचे आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी सिल्लोड काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याआधीही पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्यांची संख्या आता 7 झाली आहे.

उद्धव ठाकरेंनी हर्षवर्धन जाधवांची भेट नाकारली

मराठा आरक्षणाबाबत आज उद्धव ठाकरेंनी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली होती. दरम्यान, राजीनामा दिलेले आमदार हर्षवर्धन जाधव मातोश्रीवर पोचले. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटीची वेळ दिली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शिवसेना भाजपसोबत जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours