पंढरपूर, 23 जुलै : आज आषाढी एकादशी आहे. "पृथ्वीवरी तीर्थे असती अपार । परी पंढरीची सर । एकाही नाही ॥" असं म्हणत आज लाखो भक्त चंद्रभागेतीरी दाखल झाले आहेत. मोठ्या भक्तिभावात पंढरपूरमध्ये आज विठ्ठल-रूक्मिणीची पूजा संपन्न झाली. हिंगोलीच्या अनिल आणि वर्षा जाधव या मानाच्या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते विठुमाऊलीची शासकीय महापूजा संपन्न झाली. पहाटे 3 वाजता विठुरायाच्या पूजेला सुरूवात झाली. सुरूवातीला विठ्ठलाला अभ्यंग स्नान घातल्यानंतर मोठ्या भक्तिभावानं पुजा करण्यात आली. त्यानंतर रूक्मिणी माऊलीची पूजा संपन्न झाली. अख्खं पंढरपूर टाळ-मृदुंगाचा गजर आणि पांडूरंगाच्या जयघोषानं दुमदुमून गेलं आहे.
हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो अशी यामागची भावना आहे. दरम्यान, आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर मंदिराला नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours