विजय मल्ल्याने आर्थर रोड योग्य त्या सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार केल्यानंतर सीबीआयनं लंडन कोर्टात कारागृहाचा व्हिडीओ सादर केला आहे. आठ मिनिटांच्या या व्हिडीओत विजय मल्ल्याचे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. मल्ल्याने कारागृहात उजेड किंवा पाणी नसल्याची तक्रार केली होती. यानंतर लंडनच्या वेस्टमिनिस्टर्स मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या जज एमा आर्बथनॉट यांनी भारताला व्हिडीओ सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार हा व्हिडीओ सादर करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओमध्ये आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक १२ मध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी मुबलक जागा असून तिथे आराम करण्याचीही व्यवस्था असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यासोबतच बराकमध्ये खासगी शौचालय, टीव्ही आहे. मल्ल्याला रोज स्वच्छ चादरी आणि उशा दिल्या जातील.
मुंबईतील सर्वात सुरक्षित असणाऱ्या आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक १२ चा व्हिडीओ शूट करुन अधिकारी त्याची सविस्तर माहिती देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आर्थर रोड कारागृहातील सुरक्षा आंतरराष्ट्रीय दर्जाची असून सगळीकडे सीसीटीव्ही आहेत. याशिवाय कारागृहात आणि बाहेर दोन्हीकडे सुरक्षारक्षक तैनात असल्याचं सांगण्यात आलं आहे.
विजय मल्ल्याला भारतात आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आहे. आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्र सरकारने लंडन न्यायालयात दिली होती. विजय मल्ल्याची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं.
आर्थर रोड कारागृहात मल्ल्याच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था उपलब्ध आहे अशी माहिती केंद्र सरकारने आपल्या रिपोर्टमध्ये दिली होती. १९२५ रोजी बांधकाम करण्यात आलेल्या आर्थर रोड कारागृहाची ८०४ कैद्यांची क्षमता आहे. २ मार्च २०१७ ला विजय मल्ल्या दुपारी १.३० वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली लंडन '९W १२२' विमानाने रवाना झाला होता. विजय मल्ल्याला देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.
Post A Comment:
0 comments so far,add yours