नागपूर: नागपूर शहरात विकासकामांची जबाबदारी ही महापालिकेची असताना ती जबाबदारी मेट्रोकडे दिली जातेय. शहराला मुलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही महापालिकेची असताना महापालिकेला डावलून विकास कामं मेट्रोला दिली जाते आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विरोधकांनी यात भ्रष्ट्राचार होत असल्याचा आरोप केलाय. नागपूर शहरात महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास या स्वयत्त संस्था असतांना शहरातील विकास कामांची जबाबदारी ही महामेट्रोकडे देण्यात आल्याने नवा वाद निर्माण झालाय. शहरातील यशवंत स्टेडियम परिसर पाडून नवे स्पोर्ट्स काँम्पेक्स, रेल्वेस्टेशन समोरील पुल पाडून नवा सहापदरी मार्ग आणि 'लंडन स्ट्रीट'च्या धर्तीवर 'आँरेज सिटी स्ट्रीट' हे प्रकल्प महामेट्रोला देण्यात आले आहेत. मेट्रोकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ आहे म्हणून त्यांना ही कामे देण्यात आली असल्याचे माजी महापौर प्रविण दटके यांनी सांगितले.
हे प्रकल्प हातचे गेल्यानं या प्रकल्पातुन मिळणारे महसुल आता मिळणार नाही. त्यामुळं आधीच डबघाईस आलेली महापालिका पुन्हा आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. विरोधकांनी मात्र भ्रष्ट्राचार करता यावा म्हणून हे काम मेट्रोकडे देण्यात आल्याचा गंभिर आरोप केलाय. महापालिकेत सर्वांना सांभाळावं लागतं. मेट्रोमध्ये फक्त व्यवस्थापकीय संचालकांना आदेश दिले की सर्व कामं आपल्या मर्जीतल्या माणसाला देता येतात, असा आरोप कॉंग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी केलाय.
महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास या दोन विकास संस्थांमध्ये लोकनिर्वाचित सदस्यांद्वारे कुठल्याही प्रकल्पावर सर्वंकश चर्चा होते. या चर्चेत प्रकल्पात काही उणिवा असल्यास त्या दूर केल्या जातात. त्यानंतर एकमत तयार होतं. मात्र, मेट्रोच्या एककल्ली कारभारामुळं लोकशाहीकृत प्रक्रियेला तडे जाणार नाही का? असे प्रश्न उपस्थित झाला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours