मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची आज भेट झाली. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला हे दोन्ही नेते उपस्थित होते.यावेळी दोन्ही नेत्यांनी खुपवेळ गप्पा देखील मारल्या. वरळीत झालेल्या या लग्नाला अनेक नेते उपस्थित होते. लग्नाचं निमित्त साधत भुजबळांनी उद्धव ठाकरेंकडे आपलं मन मोकळं केल्याची चर्चा आहे. या लग्नाला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. मात्र लक्ष वेधलं ते उध्दव ठाकरे आणि भुजबळांच्या भेटीने. भुजबळ मंडपात आल्यानंतर त्यांच्या इतर नेत्यांशी भेटी गाठी सुरू होत्या. तेवढ्यात उद्धव ठाकरेंचं आगमन झालं, त्यांच्यासोबत संजय राऊतही होते. उद्धव आल्यानंतर सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. नंतर उद्धव, भुजबळ आणि संजय राऊत एकाच सोफ्यावर बसले आणि भुजबळ आणि उद्धव यांच्यात बराचकाळ संवाद सुरू राहिला.
धीर गंभीर मुद्रेतले भुजबळ उद्धव यांच्याशी बोलत होते आणि उद्धव त्यांना प्रतिसाद देत सर्व ऐकत होते. तुरूंगात असताना भुजबळांना सामनामधून पाठिंबा देण्यात आला होता. त्यानंतर भुजबळांनीही झालं गेलं विसरून पंकज भुजबळांना मातोश्रीवर पाठवलं होतं आणि बाळासाहेंबाची आठवण काढत उद्धव ठाकरेंचे आभारही मानले होते. नंतर नाशिक विधानपरिषद निवडणूकीत भुजबळांनी शिवसेनेला मदतही केल्याचं स्पष्ट झालं.
शिवसेनेतून फुटून निघाल्यानंतर भुजबळ आणि शिवसेनेत प्रचंड कटुता निर्माण झाली होती. बाळासाहेबांच्या अटकप्रकरणानंतर त्यात अधिकची भर पडली. नंतर मात्र खूप पाणी वाहून गेलं. भुजबळ बदलले आणि शिवसेनाही बदलली. राष्ट्रवादीत काहीसे एकाकी पडलेले भुजबळ पुन्हा शिवसेनेत जाणार का अशीची चर्चा सुरू झाली होती. मात्र अशी शक्यता फेटाळून लावली. मात्र आजच्या भेटीने भुजबळांना शिवसेनेतले जुने दिवस नक्कीच आठवले असणार असं बोललं जातंय.
Post A Comment:
0 comments so far,add yours