मुंबई : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. या चर्चेत मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याचं कळतंय. तसंच  राज्यसभेच्या उपसभापतिपदासाठी पाठिंबा देण्याबाबतही शहांनी विचारणा केली. तसंच राज्य मंत्रीमंडळ विस्तार आणि फेरबदलवर ही चर्चा झाल्याचं कळतंय.
राज्यसभा उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने मोर्चबांधणी सुरू केलीये. याचाच एक भाग म्हणून अमित शहांनी 'मातोश्री'वर फोन केला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत अमित शहांनी फोनवर चर्चा केली. राज्यात पेटलेल्या मराठा आंदोलनावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अमित शहांनी मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका जाणून घेतली.
तसंच राज्यसभा उपसभापतीपदासाठी निवडणूक होत आहे. यात शिवसेनेची दोन मतं भाजपला गरजेची आहे. शिवसेनेनं आपला पाठिंबा द्यावा अशी मागणी अमित शहांनी उद्धव ठाकरेंना केली. राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल होणार आहे. याबद्दलही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. विशेष म्हणजे लवकरच अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे.
मागील महिन्यात 6 जून रोजी अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास मॅरेथाॅन बैठक पार पडली. या बैठकीत मतभेद आणि मनभेद यावर चर्चा झाली होती. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये खडा सामना रंगला होता. भाजपने ही निवडणूक जिंकली पण शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीचे संबंध ताणले गेले होते. त्यानंतर खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 'मातोश्री'वर दाखल झाले होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours