मुंबई, ०८ सप्टेंबर- गणेशोत्सवाची लगबग आता वाढत चालली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे, नैवेद्यापासून ते सजावटीपर्यंत साऱ्यांच गोष्टींकडे लक्ष दिले जात आहे. आगमनापासून ते विसर्जनापर्यंतच्या सगळ्या गोष्टींची यादी काढली जात आहे आणि त्यानुसार काम केलं जात आहे. गणेशोत्सवासाठी अंधेरीच्या स्प्राऊट्स एनजीओनं एक आगळा वेगळा उपक्रम राबवलाय. चक्क गणपतीच्या मूर्तीमध्ये माशांचं अन्न भरलंय. जेणेकरून मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर ते अन्न माशांना खायला मिळेल.
गणेश मूर्तींचं विसर्जन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चौपाट्यांवर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या तुकड्यांचे खच पडलेले पाहायला मिळतात. नदी, समुद्र, तलावाच्या पाण्यातली परिस्थिती तशीच असते. याचा सर्वात जास्त परिणाम माशांवर होतो. या विचारानेच स्प्राऊट एनजीओने हा उपक्रम राबविला आहे. गणपतीच्या मुर्तीमध्ये माशांचं अन्न भरलंय. ज्यामुळे विसर्जन केल्यानंतर ते अन्न माशांना खायला मिळेल.
या उपक्रमाशिवाय स्प्राऊट्स एनजीओमध्ये इको- फ्रेण्डली गणपतीही मिळतात. या गणपतींच्या मुर्तीमध्ये स्प्राऊट्स, कॉर्न, पालक अशा उपयोगी वस्तू भरलेल्या असतात. तसेच गणपती रंगवण्यासाठी वापरण्यात आलेले रंगंही पर्यावरण पूरक असतात. सध्या अनेकजण पर्यावरणाबाबद जागरूक झाले आहेत. त्यामुळे आपल्यामुळे पर्यावरणाला हानी होऊ नये याची अनेकजण काळजी घेताना दिसतात. तर मग तुम्ही कसला विचार करताय.. तुम्हालाही आपला गणेशोत्सव पर्यावरणपुरक करायचा असेल तर या स्प्राऊट्स गणपतींचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours