यवतमाळ : सर्वत्र पोळ्याचा सण साजरा होत असताना यवतमाळात एक दुःखद घटना घडलीये. पोळ्याच्या दिवशीच एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय विश्वनाथ पारधी (वय 52) असे या शेतकऱ्याचे नाव असून यवतमाळ तालुक्यातील मनपूर येथे ही घटना घडली.

पाच एकर शेतीचा मालक असलेल्या विजय यांच्यावर बँकेचे 80 हजाराचे कर्ज होते. त्यांना चार मुली असून दोन मुलींचं लग्न झालं आहे, तर अन्य दोन मुली शिक्षण घेत आहेत. गेल्या वर्षी गुलाबी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे बँकेत आले. या पैशासाठी ते गेल्या आठ दिवसांपासून बँकेत येरझारा मारत होते. मात्र, पोळ्याचा सण येवूनही मदतीची रक्कम पदरी न पडल्याने ते निराश झाले. अखेर ऐन पोळ्याच्या दिवशी त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे मनपूर गावावर शोककळा पसरली आहे.

पीक कर्ज देण्यास बँका करताहेत टाळाटाळ

यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळालाच नाही. अशातच बँका सुद्धा पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आर्णी तालुक्यातील जवळा येथील शेतकऱ्यांनी गेल्या बुधवारी स्टेट बँकेसमोर 'जवाब दो' आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

गेल्या वर्षी गुलाबी बोण्ड अळीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कबरडे मोडले. शेतकऱ्यांचा लावलेला पैसा सुद्धा निघाला नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. अशातच या वर्षी कर्ज देण्यास बँक टाळाटाळ करत असल्यामुळे त्रस्त झालल्या जवळा परिसरातील शेतकऱ्यांनी 'जवाब दो' आंदोलन केलं. यावेळी बँकचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली होती. त्वरित कर्ज वितरित करण्यात यावे, अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours