नवी दिल्ली: केंद्र सरकार 28 सप्टेंबरला 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार आहे. 'पराक्रम पर्व' असं या कार्यक्रमाचं नाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 सप्टेंबरला या कार्यक्रमांची सुरूवात करणार आहेत. याचा मुख्य कार्यक्रम इंडिया गेटवर होणार आहे. सर्व देशभर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी एक गीतही तयार करण्यात आलंय. प्रसून जोशी यांनी हे गीत लिहिलंय. ''मेरा देश मेरी जान है, मेरा गर्व है अभिमान है. ये अभिमान है जिंदा क्योंकि सीमा पर है वीर जवान.. असे त्या गीताचे शब्द आहेत.
प्रसिद्ध गीतकार प्रसुन जोशी यांनी लिहिलेलं हे गीत गायक कैलाश खेर यांनी आपल्या बुलंद आवाजात गायलं आहे. एक दोन दिवसांमध्ये हे गीत रिलीज करण्यात येणार आहे. NSS कॅडेट्सना या निमित्त भारतीय जवानांच्या पराक्रमाबद्दल माहिती दिली जाणार आहे.
सर्व राज्य सरकारांनीही या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास मान्यता दिली असून पंजाब सरकार मोठ्या प्रमाणावर हा दिवस साजरा करणार आहे. लष्कराच्या 100 कॅन्टोंमेंट बोर्डात पराक्रम पर्व चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये बॉलिवूडच्या कलाकारांनीही सहभागी होण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
याबाबत युजीसीने सर्व विद्यापीठांना लिहिलेल्या पत्रावरून वादही झाला होता. नंतर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सर्जिकल स्ट्राइक दिना निमित्तचे कार्यक्रम हे ऐच्छिक असून सक्तीचे नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
Post A Comment:
0 comments so far,add yours