नागपूर, 25 सप्टेंबर : लहान मुलास फूस लावून त्याच्याच पाहुण्याच्या घरात चोरी करायला लावण्याऱ्या टोळीच्या लकडगंज पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका महिलेसह एकूण ५ जणांचा समावेश आहे. या टोळीने तब्बल ५५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे त्या मुलास लिंग बदलाचे आमिष दाखवून ही चोरी करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

रेहाना धनीराम धनावत, इमरान शरीफ अस्लम शरीफ, फारूख शेख रशीद शेख आणि प्रशांत सुभाष जांगडे, असे त्या आरोपीची नावे आहेत. त्यांच्यासोबत लिंगबदलासाठी गेलेल्या मुलासही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून ३२ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
गेल्या महिन्यात ५५ तोळे सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरीला गेल्याची एक तक्रार लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. या घटनेनंतर तक्रारदार महिलेचा भाचा संशयितरित्या बेपत्ता झाल्याने पोलिसांना त्या मुलावरच चोरीचा संशय होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, दीड महिन्यानंतर त्या भाच्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यावेळी त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून त्यानेच ही चोरी केली असल्याची कबूली दिली. मात्र, या चोरीचे कारण धक्कादायक होते.
गंगाजमुना पोलीस चौकीच्या परिसरात राहणाऱ्या अजय संजय पटेल यांच्या घरी ही चोरी झाली होती. पटेल यांच्या घरी त्यांचा १३ वर्षांचा भाचाही शिक्षणाच्या निमित्ताने राहायला आला होता. मात्र, त्याला मुलींप्रमाणे वेशभूषा करणे आणि राहण्याची इच्छा होत असे. त्यातच त्याचे वागणेदेखील एखाद्या मुलीप्रमाणेच असल्याने त्याच्या ओळखीतले त्याची नेहमीच टिंगल-टवाळी करत असत. त्याचे अशा प्रकारचे वागणे ओळखून संबंधीत आरोपींनी त्याला जाळ्यात ओढून चोरीची योजना आखली. त्यासाठी त्यांनी लिंगबदलाचे ऑपेरशन करता येत असल्याची माहिती त्याला दिली. त्यासाठी मुंबईला जाऊन ऑपरेशन करावे लागेल आणि त्याकरीता खूप खर्च येईल असेही त्यांनी त्याला सांगितले. तू पैसे गोळा कर आम्ही तुला मुंबईला घेऊन जातो अशी फूस लावली.
लिंगबदलाच्या ऑपरेशन करता येते असल्याने पटेल यांचा भाचा पैशाची तडजोड करण्यासाठी विचार करू लागला. त्याच दरम्यान त्याच्या एका नातेवाईकाने ५५ तोळे दागिने नागपूरच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी आणले होते. याच संधीचा गैरफायदा घेऊन त्या मुलाने ७ ऑगस्टच्या सकाळी ५५ तोळे सोन्याचे दागिने लंपास करून घरातून पळ काढला. त्यानंतर त्याने आरोपी रेहाना धनीराम धनावत या महिलेशी संपर्क साधला. पुढे रेहाना आणि तिच्या साथीदारांनी मुलाला मुंबई यथे नेऊन त्याच्याकडील ५५ तोळे दागिने विकायला सुरुवात केली.
दरम्यान, पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदाराने ५५ तोळे दागिन्यांसह पळून गेलेला मुलगा मुंबईत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सुत्रे हलवून त्या मुलासह आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून ३२ तोळे सोने हस्तगत केले असल्याची माहिती लकडगंज पोलिस ठाण्याचे पीआय संतोष खांडेकर यांनी न्यूज18 लोकमतला दिली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours